Join us

पुण्यातील बंद बेकायदेशीर, उदयनराजेंना अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 4:44 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून आज पुणे बंद पाळण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून आज पुणे बंद पाळण्यात आला आहे. बंदबरोबरच मूक मोर्चाचेही आयोजन केले. या मोर्चात विविध सामाजिक संघटना सहभागी झाले आहेत. तसेच भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेदेखील सहभागी झाले आहेत. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. हा बंद बेकायदेशीर आहे, खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्याची मागणीही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये कडकडीत बंद; शहरातील दुकानांचाही बंदला प्रतिसाद

"पुण्यातील बंद आणि हा मोर्चा बेकायदेशीर आहे, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायलयाने अनेकदा सांगितलं आहे की बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आला आहे. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे हे काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी, असंही सदावर्ते म्हणाले.

पुण्याच्या मार्केटयार्डमध्ये कडकडीत बंद

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध म्हणून आज पुणे बंद पाळण्यात येत आहे. बंदबरोबरच आता मूक मोर्चाचेही आयोजन केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांबरोबरच संभाजी ब्रिगेड व अन्य अनेक सामाजिक, स्वयंसेवी संस्था, संघटना, व्यापारी महासंघ, गणेशोत्सव मंडळे, यांनी पुणे बंदला पाठिंबा जाहीर दिला आहे. पुण्यातील मार्केटयार्ड या परिसरात शुशुकाट दिसून आला आहे. तर शहरातील दुकानांनीसुद्धा बंदला पाठिंबा दिल्याचे चित्र दिसून येत आहे. 

संभाजी बिग्रेड,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,शिवसेना,आर.पी.आए.ई .सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यानी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेतली होती. व छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या सभेमध्ये त्यांच्या आवाहनावर चर्चा करण्यात आली. पुणे बंद मध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय व्यापारी महासंघाकडून घेण्यात आला आहे. तसेच मार्केटयार्ड मधील विक्रेत्यांनी बंदला पाठिंबा देण्याचे ठरवले होते. त्यानुसार आज सकाळपासूनच मार्केटयार्डमध्ये शुकशुकाट असल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :गुणरत्न सदावर्तेउदयनराजे भोसले