वकिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देऊ शकत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:05 AM2021-07-04T04:05:02+5:302021-07-04T04:05:02+5:30
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती : उच्च न्यायालय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कोरोना टास्क फोर्सने ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती : उच्च न्यायालय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कोरोना टास्क फोर्सने वर्तवल्याने वकिलांना जुलै अखेरपर्यंत लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने शनिवारी स्पष्ट केले.
वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आम्ही न्यायालयीन आदेशाने बाजूला सारू शकत नाही. कदाचित जुलै अखेरपर्यंत आम्ही वकिलांना लोकलने प्रवास करू देण्याची परवानगी देऊ शकत नाही, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
लोकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा दिली तर कोरोनाची तिसरी लाट पसरेल, अशी भीती टास्क फोर्सला वाटत आहे. तुम्हाला (वकील) आणखी एक महिना वाट पाहावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वकिलांनाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, यासाठी ‘बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा’ने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होती.
उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय बैठकीत टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. कोरोनाची स्थिती ऑगस्टमध्ये सुधारू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले, असे म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी ३ ऑगस्टपर्यंत तहकूब केली.