मुंबई : मुंबई विद्यापीठ निकालाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने आता विद्यापीठ कंबर कसून कामाला लागले आहे.गुरुवार, २४ आॅगस्टपर्यंत विधि शाखेचे निकाल लावण्यासाठी विद्यापीठातून वकिलांना मेसेज गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता प्राध्यापक नाही, तर वकील उत्तरपत्रिका तपाणार का, असा प्रश्न उपस्थित केलाजात असून, वकिलांच्या हाती विद्यार्थ्यांचे भवितव्य असल्याची टीका सुरू झाली आहे. दुसरीकडे वाणिज्य शाखेच्या मुख्य अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप जाहीर झाले नसल्याने विद्यार्थी काळजीत आहेत.आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय आता विद्यापीठाच्या चांगलाच अंगाशी आला आहे. आॅगस्ट महिना संपत आला असला तरीही उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. प्राध्यापक मिळत नसल्याने उत्तरपत्रिका तपासणीचा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे आता विधि अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने चक्क वकिलांशी संपर्क साधला आहे. विधि अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा गोंधळ आधीपासूनच सुरू होता. आता यातून मार्ग काढण्यासाठी विद्यापीठाने ही शक्कल लढवली आहे. पण, वकिलांना आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी तसेच अभ्यासक्रम, उत्तरपत्रिकांविषयी माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याचे विद्यार्थी संघटनांचे म्हणणे आहे.राज्यपालांनी दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे विद्यापीठ आता चांगलेच अडचणीत आले आहे. निकालाचे प्रकरण न्यायालयात गेल्याने आता विद्यापीठावर दबाव वाढला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचा वेग वाढवण्यासाठी नवनवीन शक्कल लढवली जातआहे. आता वाणिज्यच्या छोट्या शाखांचे निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पण, वाणिज्यच्या प्रमुख विषयांचे निकाल रखडलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करावे, याचे उत्तर कोणाकडेच नाही. वाणिज्यच्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे दरवाजे बंद झाले आहेत.विद्यापीठ चौथी डेडलाइन पाळणार?विद्यापीठाने ७ सप्टेंबरची नवीन डेडलाइन जाहीर केली आहे. या डेडलाइनवर विश्वास ठेवावा का, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.विद्यापीठ चौथी डेडलाइन तरी पाळणार का, हे पाहण्यावाचून हाती काहीच शिल्लक नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
‘विधि’च्या उत्तरपत्रिकांची वकील करणार तपासणी? वाणिज्यच्या विद्यार्थ्यांपुढील प्रश्नचिन्ह कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 1:43 AM