अपात्रतेचा निकाल आज येणार की नाही?; ठाकरे गटाच्या वकिलांनी व्यक्त केली भीती, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 08:37 AM2024-01-10T08:37:39+5:302024-01-10T08:39:44+5:30
गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेनेतील अपात्रतेचा निकाल आज समोर येणार आहे.
Shiv Sena ( Marathi News ) : मुंबई- गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेनेतील अपात्रतेचा निकाल आज समोर येणार आहे. हा निकाल विधानसभा अध्यक्ष आज बुधवार १० जानेवारी रोजी चार वाजता वाचून दाखवण्यात येणार आहे. शिवसेना ठाकरे गट की शिंदे गट यातील कोणाचे आमदार अपात्र ठरणार, की काही वेगळा निकाल लागणार याची उत्सुकता आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वकिलांनी निकालाबाबत वेगळीच भीती व्यक्त केली आहे.
आमदार अपात्रतेचा आज निकाल; ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा; राज्यात राजकीय वातावरण तापले
ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी ही भीती फेसबुकवर पोस्ट करुन केली आहे. वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे की, 'अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील वकील म्हणून मला किंवा इतर वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेली नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार?, असा प्रश्न यात उपस्थित करण्यात आला आहे.
"कदाचित अगदी वेळेआधी कळवतील की किती वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जमायचे आहे? पण जर 400 ते 500 पानांचा निर्णय तयार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणे आवश्यक आहेच तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का?, असंही सरोदे यांनी म्हटले आहे.
ऐतिहासिक निर्णयाची प्रतीक्षा
निकाल लागण्याच्या पूर्वसंध्येला राज्यातील राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. विधिमंडळ सचिवालयाकडून निकालाची प्रत अंतिम करण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी रात्री तातडीची बैठक बोलावण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या नव्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला या वर्षा निवासस्थानी दाखल झाले. निकाल असल्याने मुंबईसह राज्यभरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.