उपाहारगृह वाचविण्यासाठी साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचे फिल्मसिटीत सत्याग्रह आंदोलन; खासदार गोपाळ शेट्टींची आंदोलनास्थळी भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 08:20 PM2021-02-26T20:20:22+5:302021-02-26T20:21:17+5:30
गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रपट नगरीतील साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्या मे. प्रफुल फास्ट फुडस या उपाहारगृहाला चित्रपट प्रशासनाने दरमहिना २ लाख रुपये भाडे आकारून ती काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई : गोरेगाव पूर्व येथील दादासाहेब फाळके चित्रपट नगरीतील साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांच्या मे. प्रफुल फास्ट फुडस या उपाहारगृहाला चित्रपट प्रशासनाने दरमहिना २ लाख रुपये भाडे आकारून ती काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांनी उपाहारगृह वाचविण्यासाठी आज उपाहारगृहात पत्नी आणि कामगारांसह सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत सत्याग्रह आंदोलन सुरु राहणार असल्याचा निर्धार गायकवाड यांनी केला आहे.
चित्रपट नगरीत साहित्यिक लक्ष्मण गायकवाड यांचे उपाहारगृह वाचविण्यासाठी सुरु असलेल्या सत्याग्रह आंदोलनाची माहिती कळताच उत्तर मुंबईतील भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आंदोलनास्थळी भेट देवून त्यांना मदत आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी खासदार शेट्टी म्हणाले की, महाराष्ट चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने गायकवाड यांना २५ हजार रूपयांवरून थेट २ लाख रूपये दरमहिना भाडे आकारणे चूकीचे आहे. कोरोना काळात आधीचं व्यवसाय डबघाईला आला असतांना एवढे भाडे कसे भरायचे असा सवाल त्यांनीं उपस्थित केला. सन २०१५ साली तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर उपाहारगृह खाली न करण्याचे दिलेले लेखी आदेश पुढे कायम ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी त्यांनी केली. गायकवाड यांचे आंदोलन हे सामान्य लोकांचे आंदोलन असून भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीमागे उभी असून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. सदर उपाहारगृह कायम ठेवण्यासाठी शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनिल प्रभू आणि चित्रपट नगरीतील प्रशासन यांच्यांशी संयुक्त बैठक घेवून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन खासदार शेट्टी यांनी दिले.
काय आहे प्रकरण?
येथील फिल्मसिटीमध्ये राज्य सरकारने १९९४ साली साहित्यिक गायकवाड यांना विशेष बाब म्हणून जागा दिली होती. या जागेवर गायकवाड यांनी उपाहारगृह उभारले आहे. त्या जागेचे भाडे आता चित्रपट प्रशासनाने २५ हजारांवरून थेट २ लाख रुपये दरमहिना केले आहे. तसेच थकबाकी नसतांनासुध्दा ६२ लाखांची थकबाकी दाखवून गायकवाड यांच्या हातातून उपाहारगृह काढून घेण्याचा डाव महाराष्ट चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्याकडून रचला असल्याचा आरोप त्यांनी केला.