मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात होत असलेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या कामांचे पितळ उघडे पाडले आहे. शहरासह उपनगरातील विविध रस्त्यांची चाळण झाली असतानाच मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर पडलेल्या खड्ड्यांनी वाहनचालकांसह पादचारीवर्गाच्या नाकीनऊ आले आहेत. एलबीएस मार्गावरील कमानी जंक्शनसह श्रेयस टॉकीज, सर्वोदय आणि गांधीनगर या ठिकाणांसह उर्वरित ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे हा रस्ता अक्षरश: तापदायक ठरू लागला आहे.लाल बहादूर शास्त्री मार्गाची जुनी ओळख ‘जुना आग्रा रोड’ अशीही असून, या मार्गावर कायम वाहनांची वर्दळ असते. मुख्यत: मुंबईबाहेर जाणारी अनेक अवजड वाहने या रस्त्याचा वापर करतात. शिवाय वाशी, नवी मुंबई आणि ठाणे या दिशेकडे जाणाऱ्या बेस्टच्या अधिकाधिक गाड्या या मार्गाचा वापर करतात. मात्र सध्या पावसामुळे एलबीएसची चाळण झाली असून, पडलेले खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. सायनपासून ठाण्यापर्यंतचा विचार करता कुर्ला डेपो, कल्पना सिनेमा, कमानी जंक्शन, श्रेयस सिनेमा, गांधीनगर, विक्रोळी स्टेशन, फिनिक्स मॉल, कांजूर मार्ग रेल्वेस्थानक सिग्नल, नेव्हल डॉकयार्ड कॉलनीसमोर, भांडुप रेल्वे स्थानक सिग्नल, भांडुप पोलीस स्टेशन, सोनापूर आणि मुलुंड या भागांत खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेकडून खडी किंवा डांबराचा वापर केला जात असला तरी पावसामुळे खडी आणि डांबर निघून जात असल्याचे चित्र आहे. परिणामी, तात्पुरती मलमपट्टी तापदायक ठरत असून, पावसाळा संपल्यावर महापालिका येथील खड्डे बुजवणार का, असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)
एलबीएस खड्ड्यात
By admin | Published: July 12, 2016 2:54 AM