लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अशा सर्व मार्गांवर मेट्रोचे बांधकाम सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्यातच अनेक रस्त्यांवर अनधिकृत पार्किंग असल्याने ही पार्किंग वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत आहे. मुंबई व ठाणे शहरांना जोडणार्या एल.बी.एस. मार्गावर अनधिकृत पार्किंगचा विळखा पडला आहे.
सायन पश्चिम येथून घाटकोपरच्या दिशेने पुढे जाताच रस्त्याच्या दुतर्फा तसेच दुभाजकालगत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्किंग केली जात आहे. अनेक वेळेस ही पार्किंग डबल व ट्रिपल केली असल्याने रस्त्यावरून वाहन चालवावे कसे, हा प्रश्न पडतो. येथे काही वाहने फुटपाथवर पार्क केल्यामुळे नक्की चालायचे कुठून, असा प्रश्न पादचार्यांना पडत आहे. बेस्ट बसच्या थांब्यासमोरही अनेकांनी गाड्या पार्क केल्यामुळे नागरिकांना बसची वाट पाहत रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. निसर्ग उद्यान, गोल्ड बिल्डिंग, कुर्ला डेपो, शीतल सिनेमा व कमानी या भागांमध्ये अनेक ट्रक, टेम्पो, जेसीबी, टॅक्सी, रिक्षा व खाजगी कार सतत रस्त्यालगत उभ्या असतात. यापैकी अनेक गाड्या बरेच महिने एकाच जागेवर उभ्या असल्यामुळे गाडीखाली कचरा जमा होतो. यापैकी बर्याच गाड्या पुन्हा दुरुस्त होण्याच्या स्थितीत नाहीत. या गाड्यांमध्ये पाणी साठून डासांची पैदास होत आहे. काही गाड्यांचे तर केवळ सांगाडे उरल्यामुळे यांचे मालक कोण, हाच प्रश्न पडला आहे. या रस्त्यावर ट्रक रांगेत पार्क केल्यामुळे रात्रीच्या वेळेस ट्रकच्या आड गर्दुल्ले ठाण मांडून बसतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी महिलांना येथून चालणे कठीण होत आहे.
वाहतूक विभागाकडून या गाड्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. येथील गाडी मालकांशी चर्चा केली असता आमची येथे युनियन आहे. त्यामुळे आमच्या गाड्यांवर कोणीच कारवाई करू शकत नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे या अनधिकृत पार्किंगवर नेमका कुणाचा वरदहस्त आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.