Join us

आघाडी अखेर फुटली, भाजपाचेही मैदान खुले

By admin | Published: May 05, 2017 5:50 AM

काँग्रेसने जादा जागा मागितल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षातही जागावाटपावरून बिनसल्याने या तिन्ही

भिवंडी : काँग्रेसने जादा जागा मागितल्याचा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षातही जागावाटपावरून बिनसल्याने या तिन्ही पक्षांनी वेगळे लढण्याचा निर्णय गुरूवारी जाहीर केला आणि अधिकृतपणे आघाडी फुटली. त्याचवेळी भाजपाने सर्व इच्छुकांसाठी आपले मैदान खुले केले आणि सर्वांना अर्ज भरण्यास सांगितले. कोणार्कनेही भाजपाशी झालेल्या समझोत्यानुसार अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनसे, बहुजन विकास आघाडी यांची नाराजांवर भिस्त होती. पण सर्व पक्ष शनिवारी एबी फॉर्म वाटणार असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. चार वॉर्डांचा एक प्रभाग झाल्याने चारही उमेदवारांच्या खर्चाचा भार उचलू शकेल, या प्रमुख निकषावर बहुतांश पक्षांनी उमेदवारी निश्चित केली आहे. ठाणे, उल्हासनगरच्या पालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे चार-चार मते देताना मतदारांनी एकाच चिन्हाला पसंती दिली, तशी मते पडावीत, यासाठी पक्षांनीही एका प्रभागात एकच चिन्ह राहील याची काळजी घेतली आहे. त्यामुळे शनिवारीच सर्व चित्र स्पष्ट होईल.धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी हा मुद्दा घेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू होता. पण काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी अन्य पक्षांना त्यांच्या सध्याच्या जागा सोडण्यासही खळखळ केल्याने ही आघाडी फुटेल असे चित्र होते. ते गुरूवारी प्रत्यक्षात आले. काँग्रेसला बाजूला ठेऊन समाजवादी आणि राष्ट्रवादी यांनी बुधवारी समझोत्यासाठी अखेरची बैठक घेतली. पण समाजवादी पक्षाच्या काही पुढाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची फोडाफोडी सुरू केल्याने ही आघाडी संपुष्टात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष खालीद गुड्डू यांनी दिली. त्यामुळे तिन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चार प्रभागात १६ उमेदवार उभे करणार आहे. काही ठिकाणी स्वतंत्रपणे उमेदवार उभे रहाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.काँग्रेसने स्वतंत्र अर्ज भरण्याची तयारी अंतिम टप्प्यात आणली असून ६९ उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. त्यांतील काहींना शुक्रवारी एबी फॉर्म देणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष शोएब गुड्डू खान यांनी दिली.समाजवादी पक्षांची भूमिका सर्वोसर्वा प्रदेशाध्यक्ष अबू असिम आझमी जाहीर करणार आहेत. प्रदेश सचिव अजय यादव बुधवारी उमेदवारांची अंतिम यादी तयार करणार होते म्हणून काही उमेदवार कार्यालयांत थांबले होते. परंतु यादव यांनी पाठ फिरवल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. आता पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष अब्दुस्सलाम नोमानी यांनी दिली. (प्रतिनिधी)भाजपाची तूर्त सर्वांनाच संधीभाजापातील वाढती नाराजी लक्षात घेता पक्षाने सर्व इच्छुकांना अर्ज भरण्यास सांगितले आहे. पण त्यातही मर्जीतील इच्छुकांनाच एसएमएस गेल्याने पुन्हा नाराजी उफाळून आली. प्रदेश कार्यालयाकडून यादी फायनल झाली की तेवढ्याच उमेदवारांना शनिवारी एबी फॉर्म दिले जाणार आहेत. पक्षाची उमेदवार यादी भाजपा प्रदेशाध्यक्षांकडे जाणार असून निवडणूकीतील उमेदवारांची अंतिम यादी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहिर करणार आहेत, अशी माहिती भाजपाचे संघटक महासचिव अ‍ॅड. हर्षल पाटील यांनी दिली.ज्या उमेदवारांच्या भाजपा कार्यालयांत मुलाखती झाल्या, त्यांना बुधवारी रात्री एसएमएस करून अर्ज भरण्.ास सांगण्यात आले. पण त्यातही काही प्रभागांत डावे-उजवे झाल्याचा इच्छुकांचा आरोप आहे.दरम्यान, भाजापातील वाढत्या नाराजीमुळे पारंपरिक मतदार बिथरल्याने आणि समझोता केलेल्या प्रभागात सुरू असलेल्या परस्परविरोधी प्रचारामुळे कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवारांतही चलबिचल सुरू झाली आहे. आॅनलाइन अर्ज वेळखाऊआॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया, त्यासाठी कागदपत्रे अपलोड करण्याचे काम वेळखाऊ असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. इंटरनेट स्लो असल्याने अनेक उमेदवार हताश झाले आहेत. आॅनलाइन अर्ज भरल्यावर त्याचे प्रिंट पुन्हा जमा करावे लागते आहे. त्यामुळे शुक्रवार-शनिवारी या प्रक्रियेत प्रचंड गोंधळ उडण्याची भीती निवडणूक अधिकाऱ्यांना वाटते आहे.