लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशांत कोरोनाची आलेली दुसरी लाट अन्य राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळा व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. यासंबंधी मुंबई पालिका शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. १५ जानेवारीनंतर शाळा सुरू होणार की नाही यासंदर्भातील निर्णय येत्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल, अशी माहिती पालिका शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली.
दरम्यान, १८ जानेवारीपासून वाणिज्य दूतावासाच्या शाळा (अमेरिकन अँड अदर काउन्स्लेट स्कूल) सुरू करण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. या शाळांना कोविड १९च्या खबरदारीचे व आरोग्य , स्वच्छता, इतर सुरक्षाविषयक नियम यांचे काटेकोरपणे पालन करूनच शाळा सुरू करता येतील, अशी माहितीही पालकर यांनी दिली. यापूर्वीही राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे मुंबईमध्ये २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली होती. शिक्षण विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याचा निर्णय सोपविल्यामुळे मुंबई पालिका प्रशासनाने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता नवीन वर्षातही आणखी १५ दिवस शाळा व शैक्षणिक संस्था बंदच राहणार असून ऑनलाइन शिक्षण पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे.
ठाणे जिल्हा परिषदेकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयीन प्राचार्यांना शाळा व शैक्षणिक संस्थांना पूर्वतयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईत शाळा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू असून लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुन्हा शिक्षक चाचण्या आणि शाळांची स्वच्छता
शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा एकदा सर्व शिक्षकांच्या कोविड १९च्या चाचण्या तसेच शाळांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया, स्वच्छतेची काळजी ही सारी प्रक्रिया पुन्हा राबवावी लागणार आहे. त्यामुळे यासाठी स्थानिक प्रशासनाने शाळा व मुख्याध्यापकांना सुरक्षा साहित्य, आवश्यक सुविधा आणि शिक्षकांच्या चाचण्यांसाठी योग्य मुदत द्यावी, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक देत आहेत.