जितेंद्र कालेकर, ठाणेगेल्या ठामपा महापौर निवडणुकीत (२०१२) ऐनवेळी सपत्नीक गैरहजर राहणाऱ्या राजन किणे यांनी आता ऐनवेळी गनिमी काव्याने शिवसेनेतून कळवा मुुंब्य्रासाठी मुलाखत दिल्याने काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांसह नेतेही संभ्रमात पडले आहेत. विशेष म्हणजे आघाडीचा तिढा अजून सुटलेला नाही. काँग्रेसने सर्वच जागा लढवायचे ठरविल्यास तिथेही एकमेव उमेदवार म्हणून किणेंनी मुलाखत दिली आहे.त्यामुळे किणेंना नेमकी उमेदवारी कुठून मिळणार की घरका ना घाटका अशी अवस्था होणार, अशी चर्चा शिवसेना आणि कॉग्रेसमध्येही सुरु आहे. अत्यंत सावध आणि गनिमी काव्याने किणे यांनी ‘राज-का-रण’ करीत आधी काँग्रेसमधून मुलाखत दिली. तिथे किणे यांच्यासह अनेकजण इच्छुक असले तरी उमेदवारीच्या यादीत किणे यांचे एकमेव नाव आहे. गेल्या वेळी आघाडीच्या जितेंद्र आव्हाडांनी तिथे बाजी मारत ६१ हजार ५१० म्हणजेच ४६.५७ टक्के मते मिळविली असली तरी किणे यांनीही शिवसेनेतून त्यांच्याशी लढत देत दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे ३४.६९ टक्के मते मिळविली. त्यामुळे आता किणेंनी कोणताही धोका न पत्करता आघाडी होईल की नाही याचीही वाट पाहिली नाही. तसेच काँगेसशी काडीमोड न घेता थेट स्वतंत्रपणे कळवा मुंब्य्राच्या जागेसाठी शिवसेनेतून मुलाखत देऊन आघाडीतच एक प्रकारे सुरुंग लावला आहे. शिवसेनेतही उपनेते दशरथ पाटील, राजेंद्र साप्ते हे इच्छुक असतांना पुन्हा किणेंच्या मुलाखतीने शिवसैनिकही बुचकळयात पडले आहेत. किणे हे जिल्हा संपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यामुळे आपले काय होणार, असाही सवाल इतर इच्छुकांना सतावू लागला आहे.
किणेंच्या गनिमीने आघाडीचे नेते संभ्रमात
By admin | Published: September 22, 2014 12:42 AM