महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी 'या' नावावर शिक्कामोर्तब?; लवकरच करणार अधिकृत घोषणा

By मुकेश चव्हाण | Published: January 19, 2021 10:46 AM2021-01-19T10:46:28+5:302021-01-19T10:47:38+5:30

प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत होती.

Leader Nana Patole is likely to be selected for the post of Congress state president in Maharashtra | महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी 'या' नावावर शिक्कामोर्तब?; लवकरच करणार अधिकृत घोषणा

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी 'या' नावावर शिक्कामोर्तब?; लवकरच करणार अधिकृत घोषणा

Next

मुंबई/ नवी दिल्ली: राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड अलीकडेच हायकमांडने केली, त्यापाठोपाठ आता राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू आहे. याचदरम्यान महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानूसार, पुढच्या दोन ते तीन दिवसात कधीही नाना पटोले यांच्या महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदीच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. प्रदेशाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे नेते राजीव सातव, विजय वडेट्टीवार यांचीही नावे चर्चेत होती. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाना पटोले यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा ही प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतही चर्चा केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र नाना पटोले यांचं नाव निश्चित झाल्याने आता महाराष्ट्रात विधानसभेचा नवा अध्यक्ष देखील बदलावा लागणार आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याची ही चर्चा सुरु होईल.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस संघटनेत बदल होणार असल्याची चर्चा सुरु होती, मंत्रिपद आणि प्रदेशाध्यक्ष अशी दुहेरी भूमिका सांभाळणाऱ्या बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी केली आहे. राज्यातील काँग्रेसला पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष मिळावं अशी चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु होती, त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलण्यापेक्षा स्वत:हून या पदातून मुक्त होण्याची तयारी बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सध्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री आणि काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी आहे.

बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वात काँग्रेसने मागील विधानसभा निवडणुकीत ४४ जागा जिंकल्या होत्या, त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणण्यातही त्यांची भूमिका निर्णायक होती, प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याचा बाळासाहेब थोरात यांची भूमिका असली तरीही हायकमांड काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं आहे. बाळासाहेब थोरात यांना पक्षाची वाढ करत सरकार सांभाळण्याची दुहेरी भूमिका सांभाळावी लागत होती.

Web Title: Leader Nana Patole is likely to be selected for the post of Congress state president in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.