मुंबई- विरोधी पक्षनेते अजित पवार सकाळी सहा वाजेपासून काम करतात, असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावर आधी अजित दादा टीका करत होते. आता सुप्रियाताई सुद्धा टीका करत आहेत. त्यांना माझे सांगणे आहे की, ताई मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं.
एकनाथ शिंदेंच्या या विधानावर आता अजित पवारांनी सवाल उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, मग झोपतात कधी?, असं सवाल अजित पवारांनी विचारला आहे. तसेच वेदांता प्रकल्पावरुन तरुणांनी पेटून उठलं पाहिजे. या प्रकल्पामुळे दीड लाख लोकांचा रोजगार हिरावला गेला असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे.
फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्यामुळे मोठी गुंतवणूक राज्यातून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प राज्यातच राहावा म्हणून पाठपुरावा केला पाहिजे. हा प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू आहे, अशी टीकाही अजित पवारांनी यावेळी केली. ते आज जळगावमध्ये बोलत होते.
आमच्या सरकार असताना हे मोठे प्रकल्प राज्यात येणार होते. अनेक उद्योग येणार होते. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सुद्धा तळेगाव हीच योग्य जागा सांगितलं होत. त्याच वेळी त्या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये पाहणी केली होती. नंतर १०० गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र अंतिम केलं होतं. ही गुंतवणूक राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये गेली. ही गुंतवणूक राज्यातून जाणं योग्य नाही, असं अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान, आम्ही ही बाब मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला जावं, प्रयत्न करावेत. मुख्यमंत्र्यांचे मोदींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प राज्यातच रहावा म्हणून पाठपुरावा केला पाहिजे. हा प्रकल्प महाराष्ट्रात होत असताना त्यावेळी आमच्या सरकारने प्रकल्पाला विविध सवलती देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली होती. या प्रकल्पासाठी तळेगाव येथील जमीन देखील निश्चित करण्यात आलेली होती, असे अजित पवार म्हणाले.