मुंबई- पुणे शहरातील कसबा तर पिंपरी चिंचवड मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'प्रत्येक पक्षाला आपली-आपली तयारी करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसमधून कोणही आले नव्हते.पण, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. आमची चर्चा झाली आहे. माझ्याकडे आतापर्यंत नऊ जणांनी उमेदवारी मागितली आहे. यावर आम्ही चर्चा करुन निर्णय घेणार आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
कसबा मतदारसंघातही काँग्रेस तयारी करत आहे, आघाडी काळात आम्ही ही जागा काँग्रेला सोडली होती, त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस तयारी करत आहे. या संदर्भात मी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे, असंही अजित पवार म्हणाले.
'राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक होणार आहे, या बैठकीतही आम्ही चर्चा करणार आहे. बिनविरोधी संदर्भात बोलताना अजित पवार म्हणााले, मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. कोल्हापूर, देगलुरला निवडणूक झाली आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर त्याचा विचार करायला पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
उद्योगपती गौतम अदानींविरोधातील रिपोर्टवर अजित पवारांची प्रतिक्रिया
अदानी समुहाविरोधात अमेरिकेतील हिंडेनबर्ग या रिसर्च संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामुळे शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. या रिपोर्टमुळे अदानी समुहाचा मोठा तोटा झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अदानी समुहाच्या शेअरमध्ये घसरण सुरू आहे, यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'या संदर्भात देशपातळीवर चर्चा सुरू आहे. ज्या परदेशी कंपनीने आरोप केला आहे. अदानी ग्रुपनेही ४०० पानांचे यावर उत्तर दिले आहे. आज भारतीय नागरिक म्हणून सर्वात श्रीमंत म्हणून गणली जाणारी व्यक्ती आहे. यांच्या संदर्भात सर्व होत असताना केंद्र सरकारने यावर हस्तक्षेप करायला पाहिजे, पत्रक काढून परिस्थिती सांगितली पाहिजे. एवढ सगळ होत असताना केंद्र सरकार या संदर्भात का शांत बसले आहे. वस्तुस्थिती काय आहे, ती केंद्राने लोकांना सांगायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली.
'अदानी समुहाची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्वांना बसणार आहे. त्यामुळे केंद्राने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. सध्या देशातील सर्वजण या प्रकरणावर बुचकळ्यात पडले आहेत. आपल्या देशासह बाहेरच्या देशातही अदानी समुहाची मोठी गुंतवणूक आहे, त्यामुळे केंद्राची वत्त विभागाने यावर स्पष्टीकरण देऊन लोकांना सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले.