मुंबई- एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे देखील दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. त्यातच आता औरंगजेबच्या कबरीला संरक्षण पुरवल्याने विरोधाकांनी राज्य सरकारला चांगलचं घेरलं आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. हनुमान चालिसा म्हणायला जाणार हे समजताच राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. मग औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करणे राजशिष्टाचार आहे का? सत्तेसाठी लाचार आणि आंधळी सरकार जनता पाहतेय, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, खुल्ताबादमध्ये गेल्यानंतर सर्वजण औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतात असं औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे यावरुन कोणताही वाद निर्माण करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी सांगितलं. औरंगाबादमध्ये गरीब मुलांना शिक्षण घेता यावं यासाठी सर्व सुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक शाळा सुरु करण्यात येणार आहे. यासाठीच एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन सर्व दर्ग्यांचं दर्शन घेतल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं होतं.
'...त्यांनी इथे येऊन राजकारण करु नये'- राष्ट्रवादीचे नेते शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील आता सदर प्रकरणाचा निषेध केला आहे. एखादा राजकारणी बाहेरून येऊन औरंगजेबच्या समाधीला जातो या गोष्टीचा मी निषेध करतो, असं शरद पवार म्हणाले. तसेच राज्यात कुठेतरी जातीपातीचे राजकारण होत असून त्याला महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास माहीत नाही त्याने इथे येऊन राजकारण करू नये, अशा शब्दात शरद पवारांनी ओवेसींना ठणकावले आहे.