मुंबई : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना माता रमाबाई आंबेडकर पोलिसांनी मुंबई बँक गैरव्यवहार प्रकरणात पुन्हा समन्स बजावत ११ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. मुंबई बँकेच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. याच प्रकरणात दरेकर यांना नोटीस बजावत, ४ एप्रिलला त्यांच्याकडे तीन ते साडेतीन तास चौकशी करण्यात आली होती. या दरम्यान पोलीस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांच्याकडे तीन ते साडेतीन तासांच्या चौकशीनंतर ते बाहेर पडले. त्यांचा जबाब नोंदवून पोलीस अधिक तपास करत आहे. या दरम्यान, त्यांच्याकडे काही कागदपत्रांची मागणीही करण्यात आली आहे, तसेच मजूर असल्याचे पुरावेही मागण्यात आल्याचे समजते. यापूर्वीही पोलिसांनी काही कागदपत्रे ताब्यात घेतली होती.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पुन्हा बजावले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 8:54 AM