Join us

दिल्ली सील करण्यापेक्षा 'दिल खोलो और बात करो'; आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, केंद्रावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 3:07 PM

शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आपल्या मागण्या घेऊन दिल्लीकडे मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांचा 'दिल्ली चलो' मोर्चा दोन दिवसांपासून थांबवण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. याशिवाय सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डरवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या सीमांवर सिमेंट आणि लोखंडाचे बॅरिकेडिंगही करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना रोखण्यासाठी काटेरी तारा आणि कंटेनरही ठेवण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांवर अश्रू धूर सोडले जातात. मग हे राज्य नेमकं कुणाचं?, दिल्ली सील करण्यापेक्षा 'दिल खोलो और बात करो', असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. महिला, शेतकरी, गरीब आणि युवा वर्गासाठी पुढील वर्षापासून काम करणार असं केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितलं. मग दहा वर्ष तुम्ही काय केलं?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

हरियाणातील ७ जिल्ह्यांमध्ये आजही मोबाईल इंटरनेटवर बंदी 

हरियाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा जिल्ह्यात आजही मोबाईल इंटरनेटवर बंदी राहणार आहे. याशिवाय २२ पैकी १५ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू आहे. शेतकऱ्यांच्या २५०० ट्रॅक्टर ट्रॉली शंभू सीमेवर पोहोचल्या आहेत. त्यापैकी ८०० ट्रॉलीमध्ये खाद्यपदार्थ, लाकूड आणि पेट्रोल आणि डिझेल घेऊन जात आहेत. सहा महिन्यांपासून 'दिल्ली चलो' मोर्चासाठी शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून तयारी करत आहेत.

टॅग्स :शेतकरीआदित्य ठाकरेकेंद्र सरकार