मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस बंडखोर नेते आणि माजी विरोधी पक्षनेते यांनी राजीनामा देत भाजपा सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. या जागेवर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करावी अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली आहे. त्यावरुन संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडेंनी विरोधकांना टोला लगावला आहे.
विनोद तावडे यांनी म्हटलं की, विरोधी पक्षांना जनतेने ठेंगा दिला आहे. विरोधी पक्षनेता कराल तो भाजपात येणार नाही याची काळजी घ्या. कारण या सरकारच्या कार्यकाळात जे विरोधी पक्षनेते झाले ते सरकारमध्ये आले असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला तर विजय वडेट्टीवार यांनीही तावडेंना उत्तर देत सत्ता आली तर तिकडे येईल, निष्ठा वारंवार बदलणार नाही. एकवेळ मी फसलो त्यामुळे मी निष्ठा बदलणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पद देण्यात यावं अशी विनंती काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना केली आहे. त्यावर यथावकाश निर्णय जाहीर करण्याची विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.
काँग्रेसच्या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हा दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी नारायण राणे यांना मंत्रिमंडळात सामाविष्ट करत महसूल मंत्रीपद दिलं होतं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. या निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षाला 123 जागांवर तर शिवसेनेला 63 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळून 82 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने दावा करत एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेते दिलं होतं. मात्र कालांतराने शिवसेनेने भाजपाशी हातमिळवणी करत राज्यातील सत्तेत सहभागी होण्यास तयार झाली. राज्यात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यासह संपूर्ण पक्ष सत्तेत सहभागी झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही किमया करुन दाखविली होती. तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राजीनामा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच एकाच टर्ममधील दोन विरोधी पक्षनेते गळाला लावण्याची कामगिरी भाजपाने चोख पार पाडली आहे.