आघाडीमुळे अपक्षांसह बंडखोरांचे नेते जमिनीवर
By Admin | Published: April 29, 2015 12:25 AM2015-04-29T00:25:17+5:302015-04-29T00:25:17+5:30
शिवसेना - भाजपा युतीने सत्तेचा सोपान चढण्यासाठी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले होते.
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीसह शिवसेना - भाजपा युतीने सत्तेचा सोपान चढण्यासाठी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या पाच नगरसेवकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले होते. यासाठी घोडाबाजार सुरू होता. या बाजारात एका मताची किंमत दोन कोटीपर्यंत गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. तर बंडखोरांच्या नेत्यांना युतीकडून सिडको संचालकपदाचे गाजर दाखविण्यात आले होते. काँगे्रसच्या १० नगरसेवकांना खेचण्याचीही अहमहमिका युती आणि राष्ट्रवादीकडून सुरू होती. मात्र काँगे्रसने सत्तेत सहभागी व्हावे या राष्ट्रवादी नेते गणेश नाईक यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आघाडीचे संकेत दिल्याने दोन कोटींवर पोहोचलेला अपक्षांचा भाव क्षणात खाली आला. आता पाचपैकी चार अपक्षांनी आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत.
१११ सदस्य असलेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला ५२, काँगे्रसला १० तर युतीला ४४ जागा मिळाल्या होत्या. तर पाच जागांवर अपक्ष निवडून आले होते. त्यामुळे सत्तेसाठी आवश्यक असलेली ५६ ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोन्ही बाजूंकडून घोडेबाजार होण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली होती. यात अपक्षांनी एका मताचा भाव दोन कोटी ‘फोडल्या’ने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. घोडेबाजार आणि तोडफोडीच्या राजकारणात माहीर असलेले शिवसेनेचे ठाण्यातील नेते मैदानात उतरल्याने राष्ट्रवादी प्रचंड धास्तावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाण्यातील या नेत्याने केवळ अपक्ष आणि काँगे्रसच नव्हे तर राष्ट्रवादीच्याही काही असंतुष्ट नगरसेवकांना गाठून त्यांना निवडणूक प्रक्रियेच्या वेळी गैरहजर राहण्याची गळ घातल्याची चर्चा आहे. मात्र आघाडीच्या घोषणेनंतर हा घोडेबाजार थांबला असून अपक्षांसह त्यांचे नेते जमिनीवर आले आहेत. (प्रतिनिधी)
पवार शिष्टाई यशस्वी
च्राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँगे्रसचे वरिष्ठ नेते ए. के. अँटोनी यांच्याशी चर्चा करून नवी मुंबई महापालिकेत आघाडी करणे का आवश्यक आहे, दोन्ही काँगे्रसला ती कशी फायदेशीर आहे, कार्यकर्त्यांत यामुळे जान कशी फुंकली जाईल, हे पटवून दिले. त्यानंतर सूत्रे हलली.
च्अँटोनी यांनी संकेत दिल्यानंतर काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी आघाडीला हिरवा कंदील दाखवला. तर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आघाडीची घोषणा केली.