नेते, उमेदवारांनी गाजवला पहिला रविवार
By admin | Published: February 6, 2017 03:17 AM2017-02-06T03:17:32+5:302017-02-06T03:17:32+5:30
महापालिका निवडणुकीची रंगतदार रणधुमाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या रविवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनांसह भेटीगाठींवर अधिक भर दिला
मुंबई : महापालिका निवडणुकीची रंगतदार रणधुमाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या रविवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनांसह भेटीगाठींवर अधिक भर दिला. महत्त्वाचे म्हणजे ‘नेट’ टीमने उमेदवारांचा प्रचारासाठी सोशल नेटवर्क साईट्सची जोड घेतल्याने रविवारचा मुहूर्त प्रथमदर्शनी तरी सत्कारणी लागल्याचे चित्र मुंबईत सर्वत्र दिसून आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गिरगावनंतर आज भांडुप आणि मुलुंडमध्ये वादळी सभा घेऊन वातावरण चांगलेच तापवले. शनिवारच्या मराठमोळ्या गिरगावातील सभेतही त्यांनी भाजपावर चौफेर फटकेबाजी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शनिवारी भाजपावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. मुंबई शहरात वरळी येथे शिवसेनेच्या उमेदवार आणि महापौर स्नेहल आंबेकर यांनी रस्तोरस्ती मतदारांच्या गाठीभेटीवर जोर दिला. गिरगाव येथील उमेदवारांनी कार्यालयांचे उद्घाटन करीत उत्साहाची छायाचित्रे नेटवर व्हायरल केली.
पूर्व उपनगरात कलिना विधानसभेत मनसेच्या उमेदवारांनी कार्यालयात दाखल झालेल्या समर्थकांसह मतदारांशी थेट संवाद साधला. विशेषत: कलिना विधानसभेत ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळांनी उमेवारीप्राप्त उमेदवारांना शुभेच्छा देणारे फलक लावल्याचे दिसून आले. तत्पूर्वी येथेच सार्वजनिक मंडळांनी शनिवारी बैठका घेत ‘मतदाना’ची रणनीती आखल्याची माहिती मिळाली.
समर्थकांच्या गाठीभेटींवर भर
सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांपाठोपाठ पश्चिम उपनगरातही काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत मुंबईकरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तर इकडे काँग्रेसला चारीमुंड्या चीत करण्याची भाषा करणाऱ्या भाजपासह शिवसेनेनेदेखील पश्चिम उपनगरात समर्थकांच्या गाठीभेटी घेत जाळे वाढविण्यावर भर दिला. एकंदर प्रचाराच्या पहिल्या रविवारी शिवसेनेची झालेली जाहीर सभा वगळता उर्वरित राजकीय पक्षांनी गुप्त-खासगी बैठकांसह कार्यालयात आलेल्या समर्थकांच्या भेटीवर जोर दिल्याचे दिसून आले.