मुंबई : आर्थिक संकटात असलेल्या बेस्टने खर्च व नुकसान कमी करण्यासाठी काटकसरीचा मार्ग पत्करला आहे. यामध्ये नेत्यांच्या मर्जीखातर सुरू केलेल्या बसमार्गांमध्येही कपात होणार आहे. या बसमार्गांतून ४० टक्केही उत्पन्न मिळत नसल्याने, या बस मार्गांचे अंतर कमी अथवा ते बंद करण्यात येणार आहे.बेस्ट उपक्रमामार्फत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मिळून ५०९ बसमार्ग चालवले जात आहेत. मात्र, आजघडीला एखाद्या बसमार्गाचा अपवाद वगळता, बेस्ट नुकसानीत आहे. उत्पन्नापेक्षा खर्च मोठा असल्याने, बेस्टला टाळे लागण्याची वेळ आली आहे. कामगारांचे मासिक वेतन देण्याएवढे पैसेही बेस्टकडे नाहीत. दुसरीकडे तूट कमी करण्याचा कृती आराखडा दिल्यानंतरच बेस्टला आर्थिक मदत देण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे. त्यानुषंगाने काटकसरीच्या योजना आखण्यात आल्या असून, सर्व भत्ते, सवलती व सुविधा बंद करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार, निवडणुकीच्या काळात अथवा मतदारांच्या मागणीनुसार राजकीय नेत्यांच्या इच्छेखातर सुरू केलेल्या बसमार्ग बंद होणार आहेत. (प्रतिनिधी)- तुटीत चालणाऱ्या बसमार्गांचा अभ्यास करून, अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये दीडशे अशा बस मार्गांचा समावेश आहे. या बसमार्गामध्ये बदल किंवा त्यांचे अंतर कमी करण्यात येणार आहे.
नेत्यांचे ‘बेस्ट’ बसमार्ग बंद होणार
By admin | Published: April 09, 2017 3:35 AM