होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:01 AM2024-05-14T10:01:30+5:302024-05-14T10:09:14+5:30
दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले.
मुंबईला सोमवारी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. त्यात ८ जणांचा मृत्यू झाला, तर ७८ जण जखमी झाले. मृतांची संख्या वाढली असून, हा आकडा आता १४ वर गेला आहे. एकीकडे बचाव मोहिम सुरू होती तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये वाद झाला. मुंबई ईशान्य लोकसभेचे उमेदवार संजय दिना पाटील आणि भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्यात वाद सुरू असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
भाजपा नेते किरीट सोमय्या घटनास्थळी आत गेल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील भडकले. 'भाजपा नेते बचाव कार्यात अडथळा आणत होते,सोमय्या यांच्यामुळे बचाकार्य थांबवले होते तसेच सोमय्या कॅमेरा घेऊन आतमध्ये का गेले होते असा सवालही पाटील यांनी केला आहे.संजय दिना पाटील यांनी बचावकार्य सुरु असलेल्या ठिकाणी कॅमेरा नेण्यावरुन मिहीर कोटेचा यांना सुनावले.
"काम करणारे लोक आहेत ना? तुम्हाला घटनास्थळी आतमध्ये जायला कोणी सांगितलं आहे? आतमध्ये रेस्क्यू टीम बचावकार्य करत आहेत मग तुम्हाला कॅमेरा घेऊन आत कशाला जायचे आहे?, असंही संजय दिना पाटील म्हणाले.
घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले
होर्डिंग अगदी तकलादू पद्धतीने लावले गेल्याचे स्पष्ट झाल्याने बेपर्वाईचे मुंबईकर बळी ठरले आहेत. होर्डिंग आणि पंपाचे छत एकत्रितपणे पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली वाहने दाबली गेली. तर मुंबईत विविध ठिकाणी झाडे पडून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. रात्री नऊपर्यंत ७८ जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्घटना एवढी मोठी होती की, राष्ट्रीय आपत्ती दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
छेडानगरला ठाण्याच्या दिशेने पूर्व द्रुतगती महामार्गावर भारत पेट्रोल पंप आहे. सायन सोडल्यानंतर थेट ठाण्यापर्यंत पेट्रोल पंप नसल्याने या पंपावर वाहनांची मोठी गर्दी असते. चारच्या सुमारास इंधन भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसापासून बचाव करण्यासाठी काही मोटारसायकलस्वारही तेथे थांबले होते. घटनास्थळी अग्निशामक दलाचे प्रमुख रवींद्र अंबुलगेकर यांच्या पथकाने तातडीने मदतकार्य सुरू केले.