नेते हो, या होळीला तुम्ही या गोष्टी न विसरता करा..!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 12:56 PM2024-03-24T12:56:31+5:302024-03-24T13:07:51+5:30
राजकारणात यापेक्षा वेगळे काय घडते? कोण कोणाच्या जीवावर निवडून येतो, कोणत्या पक्षातून येतो, कोणत्या पक्षासोबत जातो, तिथून परत कुठल्या पक्षात जातो... कोणाचा कोणाला पत्ता लागत नाही.
- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)
समस्त नेत्यांना,
नमस्कार
तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा आणि तुमच्या वागण्या-बोलण्याशी साधर्म्य असणारा होळी आणि धुळवळीचा सण आज आणि उद्या दोन दिवस आहे. दोन्ही दिवस भरपूर मजा करा, एकमेकांची उणीदुणी काढा. भ च्या बाराखडीत एकमेकांचा मनसोक्त उद्धार करून घ्या. या सणात आणि तुमच्यात साधर्म्य कसे काय? असा प्रश्न तुमच्यातल्या काही जणांना पडू शकतो. त्याचे उत्तर अगदी सोपे आहे. कोणीही येतो. कोणाचाही रंग घेतो. कोणालाही लावतो. हे या सणाचे वैशिष्ट्य. राजकारणात यापेक्षा वेगळे काय घडते? कोण कोणाच्या जीवावर निवडून येतो, कोणत्या पक्षातून येतो, कोणत्या पक्षासोबत जातो, तिथून परत कुठल्या पक्षात जातो... कोणाचा कोणाला पत्ता लागत नाही. रंग खेळताना आपल्या चेहऱ्याला पहिला रंग कोणी लावला? तो कोणता रंग होता? हे जसे रंग खेळताना लक्षात राहत नाही. तसेच तुमच्याही खेळात अनेकांना ते आधी कोणत्या पक्षात होते? आता कोणत्या पक्षात आहेत आणि भविष्यात कोणत्या पक्षात जाणार आहेत? हे कळत नाही. इतके उत्तम साधर्म्य असणारा दुसरा कोणता सण असेल सांगा बरे..?
हा सण आधी मध्यमवर्गीय मतदारांनाही खूप आवडायचा. पण त्यांचाही या सणावरचा विश्वास उडत चाललेला दिसतोय. त्यांनी कोणत्या विचारावर विश्वास ठेवून, कोणत्या पक्षाला, त्या पक्षातल्या कोणत्या नेत्याकडे पाहून मतदान केले ही बाब ते आता विसरून गेले आहेत. मतदार हा शेवटी सर्वसामान्य माणूस. त्याने तरी किती गोष्टी लक्षात ठेवायच्या..? आपण ज्यांना मतदान केले होते, ते आता अमुक पक्षात आहेत. मात्र पुढे कोणत्या पक्षात जातील? आधी त्यांनी किती पक्ष बदलले? याची नोंद ठेवायला त्याला बिचाऱ्याला वेळ तरी कुठे आहे. तुम्ही जेवढ्या उत्साहाने धुळवळीचा खेळ खेळता, तेवढ्याच निरुत्साहाने हा मध्यमवर्गीय माणूस दिवसभर घरात देशभरातील होळी टीव्हीवर पाहत बसतो. वेळ मिळाला तर एखादा सिनेमाही बघून घेतो.
तुमच्यातल्या काही नेत्यांची ही वागणूक कदाचित काही वर्षे आधी कविश्रेष्ठ सुरेश भट यांना समजली असावी. म्हणूनच त्यांनी -
रंगात रंगुनी साऱ्या, रंग माझा वेगळा...
गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा...
या ओळी म्हणूनच लिहून ठेवल्या असाव्यात. पण काही म्हणा. वेगवेगळ्या रंगात रंगूनही तुम्ही तुमचा रंग कसा वेगळा ठेवता? हा एक संशोधनाचा आणि पीएच.डी.चाच विषय आहे. आम्ही रंग खेळताना पहिला रंग कोणता लावला होता... नंतर कोणता रंग लावला? हे आम्हाला कळतही नाही. लक्षातही येत नाही. तुम्ही मात्र कधी केशरी, कधी भगवा, कधी लाल, कधी हिरवा, कधी निळा तर कधी पिवळा... वेगवेगळे रंग लावता. त्यामुळे तुमचा मूळ रंग कोणता हेही आमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे काही जणांचे चेहरे पार काळे पडून जातात... अनेकांचा मूळ रंग लक्षात येत नाही...
परवा एक नेते दुसऱ्या नेत्याला सांगत होते... या होळीला बोंबा तरी कोणाच्या नावाने मारायच्या? होळीचा शिमगा कोणाच्या नावाने करायचा? असे मूलभूत प्रश्न त्यांना पडले होते. त्यासाठी त्यांचा तर्क शुद्ध होता. ते म्हणाले, ज्यांच्या विरोधात आपण शिमगा करत होतो ते आपल्या सोबत आले आहेत... जे आपल्या सोबत होते, त्यांच्या नावाने समोरचे लोक शिमगा करत होते. तर आपल्यातले काही त्यांच्यासोबत गेले आहेत... त्यामुळे कोणी, कोणाच्या नावाने शिमगा करायचा? याचे उत्तर काही केल्या त्यांना मिळत नव्हते. तुमच्यापुढे इतके मूलभूत प्रश्न आ वासून उभे असताना, आम्ही पामर मध्यमवर्गीयांनी आमचे प्रश्न तुमच्यासमोर ठेवून कशाला तुमची अडचण वाढवायची..?
आमचे मित्र, प्रख्यात गीतकार, लेखक अरविंद जगताप यांनाही असाच एक प्रश्न काही वर्षांपूर्वी एका सिनेमाचे गाणे लिहिताना पडला होता. तो प्रश्न त्यांनी थेट विठ्ठलालाच विचारला. बाबा रे, या कार्यकर्त्यांनी आता कोणाचा झेंडा हाती घ्यायचा..? ते तू तरी सांग... त्यांचे गाणे खूप गाजले. पण त्यांना प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही...
हे गाणे कोणी लिहिले हे शोधायचा प्रयत्न केला, तर गीतकार म्हणून त्यांचे नाव लवकर सापडत नाही. कदाचित काही राजकारण्यांमध्ये संगीतकाराची उठबस वाढली असेल म्हणून तो देखील गीतकाराला विसरून गेला असेल का..? असो. पण आमच्या अरविंद जगताप यांनी लिहिलेले गाणे तुम्ही सगळे ऐका -
जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…
साचले मोहाचे धुके घनदाट हो,
आपली माणसं, आपलीच नाती...
तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती..?
आजवर ज्यांची वाहिली पालखी,
भलताच त्याचा देव होता…
पुरे झाली आता उगा माथेफोडी,
दगडात माझा जीव होता…
उजळावा दिवा म्हणूनिया किती,
मुक्या बिचाऱ्या जळती वाती...
वैरी कोण आहे, इथे कोण साथी,
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती..?
हेच ते गाणे उद्या तुम्ही धुळवळीच्या निमित्ताने डीजेवर जोरजोरात वाजवा... तुमच्यासोबत धुळवड खेळणाऱ्या कार्यकर्त्यांनाही हे गाणे ऐकू द्या. हे गाणे ऐकल्यानंतर तुमच्या भावना जाग्या झाल्या... उल्हसित झाल्या... तुम्हाला एकदम प्रफुल्लित वाटू लागले... किंवा तुम्ही फारच उद्दीपित झालात... तर बिचाऱ्या मध्यमवर्गीय, सर्वसामान्य, गरीब, दीनदुबळ्या मतदाराला त्याने नेमकी कोणाच्या नावाने स्वतःच्या बोटाला शाई लावायची हेही त्याला घरी जाऊन नक्की सांगा... तसेही आता ज्या मायबाप मतदारराजाकडे तुम्ही जाणार आहात, तो राजाही तुम्हाला तसेच मानत असेल. तेव्हा त्याचा मान ठेवा... जमल्यास त्याला या प्रश्नांची उत्तरं द्या. तुम्हाला नव्या वर्षात वेगवेगळ्या रंगांचे झेंडे खांद्यावर घ्यायला मिळोत... यावेळी आमच्याकडे येताना तुमच्या खांद्यावर कोणत्या रंगाचा झेंडा आहे हे आम्हाला आठवू नये, इतके झेंडे तुम्हाला मिळावेत... आणि तुम्ही ते आनंदाने अंगाखांद्यावर मिरवावेत... या सदिच्छांसह होळीच्या शुभेच्छा..!
- तुमचाच, बाबूराव