Join us  

त्यांच्या पोटावर नेत्यांचा पाय!

By admin | Published: May 03, 2016 12:48 AM

एकीकडे नेत्यांनी दुष्काळग्रस्तांबद्दल कळवळा दाखवत त्यांना भेट दिल्याचे, त्यांचे सांत्वन केल्याचे फोटो छापून आणायचे आणि त्याचवेळी त्यांच्या समर्थकांनी, नातलगांनी आपल्या इतर

ठाणे : एकीकडे नेत्यांनी दुष्काळग्रस्तांबद्दल कळवळा दाखवत त्यांना भेट दिल्याचे, त्यांचे सांत्वन केल्याचे फोटो छापून आणायचे आणि त्याचवेळी त्यांच्या समर्थकांनी, नातलगांनी आपल्या इतर महोत्सवांकडे गर्दी वळावी म्हणून दुष्काळग्रस्तांच्या उपजीविकेची साधने हिसकावून घेत त्यांना हुसकावून लावायचे असा उफराटा उद्योग ठाण्यात सुरू झाला आहे. दुष्काळामुळे पाऊस पडेपर्यंत कसाबसा संसाराचा गाडा हाकण्यासाठी पिठलं भाकरी विकून पोट भरणाऱ्या दुष्काळग्रस्तांना फुटकळ कारणे देत भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून दम भरण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. हे वेळीच थांबले नाहीत, तर मंत्रालयाच्या दारात चुली पेटवू, असा इशारा दुष्काळग्रस्त कुटुंबातील महिलांनी आणि ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परदेशी यांनी दिला आहे. पीक-पाणी नसल्याने दुष्काळात निम्मा महाराष्ट्र होरपळून निघत आहेत. पैसा नसल्याने, जगण्याचे साधन नसल्याने डोळ््यांतील आसवांवर कसाबसा दिवस ढकलणाऱ्या दुष्काळग्रस्तांना ठाणेकरांनी आसरा दिला. त्यासाठी कमलताई परदेशी यांनी पुढाकार घेतला. त्या कुटुंबातील महिलांनी विपरित परिस्थिती हार न मानता पदर खोचून पिठलं-भाकरीच्या आधारावर संसाराचा गाडा हाकत संसाराला बळ दिले. ठाणेकरांनीही या धडपडीला हात दिला. प्रतिसाद पाहून हा स्टॉल पाऊस पडेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आणि त्याप्रमाणे तो सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी तेथील इतर शेतकऱ्यांचे धान्यदेखील येथे विक्रीला आणण्याचे निर्णय ठरवले. दोन दिवसांपूर्वी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे धान्य घेऊन एक कुटुंब आलेही. पण गेल्या चार दिवसांपासून मंत्र्याचे नातलग असल्याचे सांगत भाजपचे काही कार्यकर्ते त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्टॉ्रल बंद करुन येथून निघून जा, असा दम भरल्याने ही दुष्काळग्रस्त कुटुंबे भेदरली असून ती येथे राहण्यास तयार नाहीत. कष्टकरी महिला रडकुंडीला आल्या आहेत. त्याचवेळी ठाणेकरांनी मात्र त्यांना त्यांचे स्टॉल बंद करू नका, असे सुचवत मनगटशाहीला विरोध करण्यास सुरूवात केली आहे. धान्य घेऊन आलेल्या शेतकऱ्याला स्टॉलही टाकू दिलेला नाही. (प्रतिनिधी) सोमवारी या शेतकऱ्याने भर उन्हात उघड्यावर धान्याची विक्री केली. धान्याचा स्टॉल लावू न दिल्याने येथे येण्यास निघालेली इतर २५ कुटुंबे घाबरून गावातच थांबली आहेत. आम्हाला जगूही दिले जात नसेल तर आम्ही आता मंत्रालयाच्या दारात जाऊन पाऊस पडेपर्यंत तेथेच ठिय्या देऊ, अशा इशारा उद््विग्न कुटुंबांनी दिला आहे.... तर मंत्रालयावर धडकू!ठाण्यात आलेले हे शेतकरी खरोखर दुष्काळग्रस्त आहेत की नाही, याची पाहणी हवे तर भाजापाच्या सरकारने करावी. त्यांचे कार्यकर्ते, नेत्यांचे नातलग कष्ट करुन खाणाऱ्यांना जगू देईनासे झाले आहेत. ठाणेकरांकडून आम्हाला चांगले सहकार्य मिळत आहे. पण असाच त्रास होत राहिला, तर हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही मंत्रालयावर धडकणार आणि तिथेच चुली मांडणार. - कमलताई परदेशी, सामाजिक कार्यकर्तेआधी परवानगी घ्या!या दुष्काळग्रस्तांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. राजेंद्र तावडे किंवा भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना धमक्या दिलेल्या नाहीत. त्यांनी अकारण इश्यू केला आहे. आमच्या आंबा महोत्सवातही दुष्काळग्रस्त आहेत. त्यांनीही व्यवसाय करावा. पण त्यासाठी त्यांनी आधी रितसर परवानग्या घ्याव्या. ते त्यांच्या स्टॉलवर स्टोव्ह वापरत आहेत. त्यातून आग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेकडून परवानगी घ्यावी.- संजय केळकर, भाजपा आमदार