मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा निधी मुंबईतील वाडिया रुग्णालयाला देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. त्यांच्या या मागणीला रिपब्लिकन नेत्यांनी मात्र विरोध दर्शविला आहे. ही भूमिका आंबेडकरी भावनाचा अवमान करणारी असल्याचा आरोप सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. तर या वक्तव्यामागचा हेतू काय, असा थेट सवाल माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी केला आहे.स्मारकासाठी इंदू मिलची जमीन मिळविण्यासाठी आंबेडकरी जनतेने प्रदीर्घ काळ संघर्ष केला. जनतेच्या मागणीनुसार स्मारक आणि पुतळा उभारण्यात येणार आहे. मात्र आता प्रकाश आंबेडकर यांनी पुतळ्याची, सुशोभीकरणाची गरज नसल्यामुळे त्याचा निधी वाडिया रुग्णालयाला देण्याची मागणी केली. ही मागणीच आंबेडकरी जनतेचा विश्वासघात करणारी, त्यांच्या भावनांचा अवमान करणारी असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला विरोध करणारे प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत की कोण आहेत, असा प्रश्न पडतो. स्मारकाचे भूमिपूजन झाले होते तेव्हा प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. आता ते या स्मारकाचा; पुतळ्याचा निधी वाडिया रुग्णालयाला वर्ग करण्याची दुटप्पी भूमिका मांडत आहेत. आंबेडकरी समाजाने मात्र जागृत राहून इंदू मिलमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्यासाठी आग्रही राहावे, असे आवाहनही आठवले यांनी केले आहे.तर, इंदू मिल येथील स्मारकासाठी आंदोलने झाली. त्यानंतर निर्णय घेण्यात आला. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्या जागेचे भूमिपूजन झाले. त्या वेळी प्रकाश आंबेडकरही हजर होते. आता त्यांनी स्मारकाचा निधी वाडिया रुग्णालयाला देण्याची मागणी करण्यामागे कोणते गणित लपले आहे? या वक्तव्यामागचा हेतू नक्की काय आहे, असा सवाल चंद्रकांत हंडोरे यांनी केला आहे.‘आंबेडकरी जनतेला विश्वासात घेतले नाही’इंदू मिल येथील स्मारकाच्या कामाबाबत सरकारने आंबेडकरी जनतेला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप सामाजिक समता मंचचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी केला आहे. स्मारकासाठी प्राधिकरण निर्माण करण्यापासून स्मारक कसे असेल ते जनतेला ठरवू द्या. प्रकाश आंबेडकर यांना स्मारकाबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण, या स्मारकासाठी त्यांनी कोणताच संघर्ष केलेला नाही, असेही कांबळे म्हणाले.
वाडिया रुग्णालयास स्मारकाचा निधी देण्यास नेत्यांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 7:25 AM