मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा तिढा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 02:05 AM2019-07-26T02:05:35+5:302019-07-26T02:05:47+5:30
मलिकांचे नाव ऐनवेळी टळले!
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा दिली जाणार होती; मात्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामुळे नवाब यांच्या नावाची घोषणा टळली, अशी माहिती सुत्रांनी दिली.
राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष पदासाठी नवाब मलिक यांच्यासह संजय दिना पाटील यांचेही नाव चर्चेत आहे. मलिक हे अजित पवार यांच्या जवळचे, तर संजय दिना पाटील हे जयंत पाटील यांचे समर्थक मानले जातात. अहिरांनी शिवबंधन बांधल्यानंतर लगेचच नवा अध्यक्ष जाहीर करावा, त्यातून चांगला संदेश जाईल असे काही नेत्यांना वाटत होते. मात्र, मलिक यांना अध्यक्ष करण्यापूर्वी काही नेत्यांशी चर्चा करावी लागेल, असे सांगत जयंत पाटील यांनी मलिकांच्या नावाची घोषणा होई दिली नाही, असे समजते.
आधीच मुंबईत राष्ट्रवादीची शक्ती मर्यादीत आहे. सचिन अहिर, नवाब मलिक आणि संजय दिना पाटील हे तीन प्रमुख नेते मानले जात. याशिवाय ज्येष्ठ नेते माजिद मेनन, विधान परिषदेतील आमदार विद्या चव्हाण आणि किरण पावसकर ही राष्ट्रवादीतील महत्वाचे नेते असले तरी एखादा विशिष्ट मतदारसंघ या नेत्यांनी बांधलेले नाही. आघाडीतील सहकारी पक्ष असणारी काँग्रेस सध्या याच वादातून निर्नायकी अवस्थेत आहे. आता राष्ट्रवादीचाही प्रवास त्याच दिशेने सुरू आहे. ना नेता, ना चेहरा अशीच मुंबईतील आघाडीची स्थिती झाली आहे.