Join us

अखेरच्या श्वासापर्यंत नेतृत्त्वाची साथ सोडणार नाही; कार्यकर्त्याने राज ठाकरेंना दिलं 'शपथपत्र' 

By प्रविण मरगळे | Published: November 30, 2019 10:28 AM

औरंगाबादचे मनसे पदाधिकारी बिपीन शंकरसिंग नाईक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना स्टॅम्पपेपरवर शपथपत्र दिलं आहे

प्रविण मरगळे

मुंबई - सध्याच्या सत्तासंघर्षात अनेक राजकीय नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारताना पाहायला मिळतात. नेत्यांच्या मागे कार्यकर्तेही पक्षांतर करत असतात. निष्ठा आणि विचार यांना तिलांजली देत राजकीय नेते सत्तेच्या बाजूने जाताना दिसतात. अशातच एका कार्यकर्त्याने नेत्याबद्दल निष्ठा दाखवित थेट त्या नेत्यालाच स्टॅंपपेपरवर लिहून पक्षासोबत कायम राहीन असं शपथपत्र दिलं आहे. 

औरंगाबादचे मनसे पदाधिकारी बिपीन शंकरसिंग नाईक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना स्टॅम्पपेपरवर शपथपत्र दिलं आहे, त्यात बिपीन नाईक म्हणतात की, पक्षाच्या स्थापनेपासून आपल्या ध्येय, धोरण व विचारांशी जोडला गेलेलो आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद येथे पक्षकार्यात होईल ते मनापासून योगदान देण्याचा आजपर्यंत पूर्णत: प्रयत्न करत आलो आहे आणि पुढेही करत राहणार असं त्यांनी सांगितले आहे. 

बिपीन नाईक यांनी वाढदिवसानिमित्त शपथपत्र लिहून दिलं आहे की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या विचारांशी व नेतृत्वाशी बांधील राहील. मी पक्षकार्यात स्वत:ला तन-मन-धनाने वाहून घेतलेले आहेच. परंतू कितीही कठीण परिस्थिती उद्भवली तरी आपली साथ सोडणार नाही. मी आपल्याशी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी प्रामाणिक राहून एक सक्रीय निष्ठावान म्हणून स्वत:ला अर्पण करत आहे अशी शपथ बिपीन नाईक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिली आहे. 

यापूर्वीही लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्याने स्टॅम्प पेपरवर पैज लावली होती. कार्यकर्ते आपलाचा नेता विजयी होईल अशा थाटात बोलत असतात. अनेक जण निवडणुकीच्या निकालांवर तर्कवितर्क लावत असतात. यात उस्मानाबादच्या राघुचीवाडी या गावातील दोन पठ्ठ्यांनी निवडणूक निकालांवर पैज लावत चक्क स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून घेतला होता. उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत यंदा शिवसेना-भाजपाकडून ओमराजे निंबाळकर निवडणूक लढवत होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून राणा रणजितसिंह पाटील निवडणुकीला उभे होते. तर लोकसभा निवडणुकांप्रमाणे विधानसभा निवडणुकांमध्येही उमेदवारांवर पैज लावण्यात आली. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघात पहिली पैज लागली होती. त्यावेळी स्टॅम्प पेपरवर कार्यकर्त्यांनी एकमेकांना लेखी आश्वासन दिले होते. 

टॅग्स :राज ठाकरेमनसे