मुंबई : जोगेश्वरीतील मेघवाडी येथे इमारतीच्या १८व्या मजल्यावरून उडी मारून, १९ वर्षीय मोलकरणीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. ज्योती हरिश्चंद्र पाटेकर (१९) असे तिचे नाव आहे. दीड वर्षापूर्वी ती कोकणातून मुंबईत घरकामासाठी आली होती. या प्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.पाटेकर हिच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने उदरनिर्वाहासाठी तिने मुंबई गाठली. मुंबईतील आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीमध्ये बिझनेस हेड असलेल्या नितीन सेवाराम खन्ना (४२) यांच्याकडे ती मोलकरीण म्हणून कामावर रुजू झाली. ते जोगेश्वरी पूर्वेच्या ओबेरॉय स्प्लेंडर इमारतीत राहात होते. ज्योतीने सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास घराच्या खिडकीतून उडी मारली. त्यात ती गंभीर जखमी झाली. खन्ना कुटुंबीयांनी तिला अंधेरीच्या हॉली स्पिरिट रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.रुग्णालय प्रशासनाकडून माहिती मिळताच मेघवाडी पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून, ज्योतीच्या पालकांना याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार, ते मुंबईत आल्यावर त्यांची कोणाविरोधात तक्रार असल्यास त्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे, अशी माहिती मेघवाडी पोलिसांकडून देण्यात आली. सध्या पोलीस या प्रकरणी घर मालक आणि त्यांचे कुटुंबीय, तसेच शेजाऱ्यांचे जबाब नोंदवत आहेत.जोगेश्वरी येथील ओबेरॉय स्प्लेंडर या इमारतीत ती मोलकरणीचे काम करायची. सोमवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास तिने या इमारतीच्या खिडकीतून उडी मारली. त्यात ती गंभीर जखमी झाली. खन्ना कुटुंबीयांनी तिला अंधेरीच्या हॉली स्पिरिट रुग्णालयात दाखल केले. तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.
१८व्या मजल्यावरून उडी मारून मोलकरणीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 2:46 AM