Join us

घर खरेदी करण्यात महिला आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:06 AM

सर्वेक्षणातील निष्कर्षओंकार गावंडलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिला हल्ली सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत. भारतात आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना ...

सर्वेक्षणातील निष्कर्ष

ओंकार गावंड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महिला हल्ली सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत. भारतात आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांना गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र रिअल इस्टेट बाजारात पुरुषांपेक्षा महिला अधिक गुंतवणूक करत असल्याचे पाहायला मिळत आहे. बँक, शेअर बाजार किंवा सोन्यात गुंतवणूक करण्यापेक्षा ६२ टक्के महिलांनी घर खरेदी करण्यात पसंती दर्शविली आहे. याउलट ५४ टक्के पुरुष आपले पैसे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवत आहेत. त्यामुळे आता घर खरेदीत पुरुषांपेक्षा महिलाच आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

ॲनारॉक संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातील हा निष्कर्ष आहे. ॲनारॉकचे संचालक प्रशांत ठाकूर यांच्या म्हणण्यानुसार सध्या महिलांना रिअल इस्टेट क्षेत्रात पैसे गुंतविणे अधिक सुरक्षित वाटते. घर खरेदी करताना ७१ टक्के महिला या रेडी टू मूव्ह म्हणजेच बांधून तयार असलेल्या घरात राहायला जाणे अधिक पसंत करत आहेत. तर इतर महिला नव्याने बांधकाम सुरू असलेल्या घरासाठी गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. सर्वेक्षणानुसार भारतातील महिला ९० लाखांच्या आसपास किंमत असणाऱ्या घरांना अधिक पसंती दर्शवत आहेत. तर अल्ट्रा लक्झरी घरांसाठी काही महिला २.५ कोटींपर्यंत किंमत मोजण्यासाठीही तयार होत आहेत.

हिरानंदानी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, हल्ली महिला केवळ घर सांभाळत नसून घर खरेदीही करीत आहेत. कोरोनाच्या महामारीनंतर बांधकाम क्षेत्रात महिला अधिक गुंतवणूक करत आहेत. स्वतःचे घर असावे असे बहुतांश महिलांचे स्वप्न असते. त्यामुळे इतर ठिकाणी गुंतवणूक करण्यापेक्षा घर खरेदीला त्या अधिक प्राधान्य देतात.

* ४६ टक्के महिलांची ३ बीएचकेला पसंती

भारतीय रियल इस्टेट बाजारात ४६ टक्के महिला ३ बीएचके, ३० टक्के महिला २ बीएचके व १० टक्के महिला ४ बीएचके घराला अधिक पसंती दर्शवत आहेत. प्रधानमंत्री आवाससारख्या सरकारी योजना, स्टॅम्प ड्युटीवर देण्यात आलेली सवलत, विविध राष्ट्रीय बँकांमध्ये महिलांसाठी कर्ज योजना व कमी व्याजदर, तसेच करसवलत या सर्व सोयीसुविधांमुळे महिलांना घर घेणे अधिक सोपे जात असल्याचे निदर्शनास येते.

.............................................

.........................