मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या तानसा (पश्चिम) जलवाहिनीला आज (दि.21) पहाटे पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागली. परिणामी, तानसा वाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. यामुळे अनेक परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तानसा जलवाहिनीला पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागल्याचे आज पहाटे आढळून आले. गळती लागल्याचे लक्षात येताच झडपा (व्हॉल्व्ह) बंद करण्यात आला. तसेच, जलवाहिनी दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीकरीता २४ तासांचा कालावधी अपेक्षित आहे.
दुरुस्ती कामासाठी पवई ते धारावी दरम्यान जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. परिणामी, एस विभाग, के पूर्व विभाग, जी उत्तर विभाग आणि एच पूर्व विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जलवाहिनी दुरुस्ती काळात नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.