नूतनीकरणानंतरही फ्लोरा फाउंटनमधून गळती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 01:22 AM2019-01-29T01:22:02+5:302019-01-29T01:22:14+5:30

हुतात्मा चौक येथील प्रसिद्ध फ्लोरा फाउंटनच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या वास्तूच्या लोकार्पणाची घाई महापालिकेला महागात पडली आहे.

Leakage from Flora Fountain even after renewal | नूतनीकरणानंतरही फ्लोरा फाउंटनमधून गळती

नूतनीकरणानंतरही फ्लोरा फाउंटनमधून गळती

Next

मुंबई : हुतात्मा चौक येथील प्रसिद्ध फ्लोरा फाउंटनच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच या वास्तूच्या लोकार्पणाची घाई महापालिकेला महागात पडली आहे. दुरुस्तीसाठी अडीच वर्षे बंद असलेले फ्लोरा फाउंटन चार दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. दक्षिण मुंबईतील विशेष आकर्षण असलेल्या या वास्तूतून थुईथुई नाचणारे कारंजे मुंबईकरांनी पाहिले. मात्र दुरुस्तीनंतरही येथून पाण्याची गळती सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

२०१६ मध्ये पालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईत सर्व पुरातन वास्तूंच्या दुरुस्तीचा निर्णय घेतला. त्यानुसार १५५ वर्षे जुन्या असलेल्या पुरातन वास्तू श्रेणी १ मध्ये असलेल्या फ्लोरा फाउंटनच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्यात आली. फ्लोरा फाउंटनची दुरुस्ती आणि आसपासच्या परिसराचे नूतनीकरण अशा दोन टप्प्प्यांमध्ये हे काम करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सव्वा कोटी रुपये तर पहिल्या टप्प्याकरिता तीन कोटी रुपये खर्च करण्यात येतील.

पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होताच २४ जानेवारी रोजी फ्लोरा फाउंटनचे लोकार्पण करण्यात आले. मात्र या ठिकाणी गळती सुरू असल्याचे दिसून आले. बाष्पीभवनाचा हा परिणाम असल्याचे सुरुवातीला पालिका अभियंत्यांना वाटत होते. मात्र दुरुस्तीवेळी एखाद्या ठिकाणी असलेली गळती थांबविणे राहून गेले असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. तसेच येथील कारंजे सतत सुरूठेवण्याची वेळ अद्याप निश्चित केलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत यावर तोडगा काढण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

यामुळेच केले नूतनीकरण....
१८६४ मध्ये फ्लोरा फाउंटन (कारंजे) बांधण्यात आले. २००७-२००८ पासून या कारंजामधून पाणी कमी येऊ लागले. तसेच कारंजासाठी वापरण्यात आलेल्या दगडांची लकाकीही कमी झाली होती. काही शिल्पकृतींचे हात, नाक असे अवयव तुटले होते. त्यामुळे २०१६ मध्ये फाउंटन दुरुस्तीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. दुसºया टप्प्यात या वास्तूच्या आसपासच्या परिसराचे सौंदर्यीकरण केले जाईल.

लवकरच दुरुस्ती
फ्लोरा फाउंटनमधील कारंजांसाठी पालिकेच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. एकावेळी कारंजांसाठी ४० हजार लीटर पाणी वापरण्यात येते. कारंजे सुरू झाल्यावर पाण्याचा पुन्हा वापर केला जातो. तसेच उन्हामुळेदेखील पाण्याचे बाष्पीभवन होते. कारंजामधून पाणी काही प्रमाणात कमी होत असले तरी पाण्याची गळती त्याहून मोठी आहे. यामुळे दर तीन दिवसांनी दहा हजार लीटर पाणी (टँकरद्वारे) या कारंजामध्ये टाकावे लागत आहे. तसेच कारंजांच्या थरांमधूनही पाणीगळती होत आहे. मात्र आता या गळतीचा शोध लागला असून लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल, असे एका अधिकाºयाने सांगितले.

Web Title: Leakage from Flora Fountain even after renewal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई