Join us  

मुंबई-२ जलवाहिनीला मुलुंड जकात नाक्याजवळ गळती, दुरुस्ती सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 7:55 PM

पूर्व उपनगरे, शहर विभागातील बहुतांश परिसरांत २७ ते २९ मार्च रात्री १० वाजेपर्यंत १५ टक्के पाणी कपात

मुंबई: पूर्व द्रुतगती महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) तर्फे पर्जन्य जलवाहिनीसाठी बॉक्स कर्ल्व्हटचे काम सुरु असताना, मुलुंड जकात नाका परिसरात हरिओम नगर येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २,३४५ मिलीमीटर व्यासाच्या ‘मुंबई – २’ जलवाहिनीस हानी पोहोचून पाणी गळती होत असल्याचे आज (दिनांक २७ मार्च २०२३) निदर्शनास आले आहे. पिसे-पांजरापूर संकुलातून पाणी वाहून आणणाऱया या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. सबब, सदर दुरुस्ती कालावधीत म्हणजे आज सोमवार, दिनांक २७ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजेपासून बुधवार, दिनांक २९ मार्च २०२३ रोजी रात्री १० पर्यंत पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील बहुतांश परिसरात १५ टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे.

पूर्व उपनगरे आणि शहर विभागामध्ये पाणी कपात होणाऱया परिसरांचा तपशील पुढीलप्रमाणे-

१) पूर्व उपनगरे-

  • टी विभागः मुलुंड (पूर्व) व (पश्चिम) विभाग 
  • एस विभागः भांडूप, नाहूर, कांजूरमार्ग, विक्रोळी येथील पूर्व विभाग.
  • एन विभागः विक्रोळी, घाटकोपर येथील (पूर्व) व (पश्चिम) विभाग
  • एल विभागः कुर्ला (पूर्व) विभाग
  • एम/पूर्व विभागः संपूर्ण विभाग
  • एम/पश्चिम विभागः संपूर्ण विभाग

 

२) शहर विभाग-

  • ए विभागः संपूर्ण विभाग
  • बी विभागः संपूर्ण विभाग
  • ई विभागः संपूर्ण विभाग
  • एफ/दक्षिण विभागः संपूर्ण विभाग
  • एफ/उत्तर विभागः संपूर्ण विभाग

 

संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, उपरोक्त नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, अशी विनंती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :पाणीमुंबई