भांडुपमध्ये जलवाहिनीला गळती, भांडुप परिसरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा नाही

By सीमा महांगडे | Published: January 25, 2024 08:43 PM2024-01-25T20:43:24+5:302024-01-25T20:43:32+5:30

पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Leakage of water channel in Bhandup, no water supply in some parts of Bhandup area | भांडुपमध्ये जलवाहिनीला गळती, भांडुप परिसरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा नाही

भांडुपमध्ये जलवाहिनीला गळती, भांडुप परिसरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा नाही

मुंबई- गुरुवारी भांडुप पश्चिमेकडील श्रीराम पाडा परिसरातील सॅडल बोगद्याजवळ १,८०० मी. मी. व्यासाच्या तानसा जलवाहिनीमधे गळती झाल्याने महानगरपालिकेमार्फत तातडीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे‌. हे दुरुस्ती काम योग्य प्रकारे व्हावे, यासाठी जलवाहिनी वरील पाण्याचा दाब कमी करणे गरजेचे असून याकरिता भांडुप कॅबिन येथील तानसा पश्चिम जलवाहिनीवरील झडप बंद करणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे १२ तासाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे भांडुप पश्चिम परिसरातील काही ठिकाणचा गुरुवारचा पाणीपुरवठा बाधित झाला. ही दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.

पालिकेने हाती घेतलेल्या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे 'एस' विभागातील भांडुप पश्चिमेकडील डोंगराळ भागात पाणी पुरवठा बाधित होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीरामपाडा, तुळशेतपाडा, वाघोबावाडी, रामनगर, तानाजीवाडी , रावते कंपाऊंड, त्रिमूर्ती नगर, शिवाजी नगर, नरदास नगर, टेंभीपाडा, साई हिल, साई विहार, सोनापूर येथील काही भाग, खिंडीपाडा, गांव देवी रोड, गाव देवी टेकडी, मरोडा हिल, पाटकर कंपाऊंड, गणेश नगर, सर्वोदय नगर तसेच भांडुप जलाशय येथून होणारा पाणी पुरवठा, रमाबाई नगर पंपिंग,  महात्मा फुले नगर पंपिंग सप्लाय व डांबर कंपनी या ठिकाणांचा समावेश आहे. तरी जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण होइपर्यंत या परिसरांमधील पाणीपुरवठा बंद राहील. तरी कृपया संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन जलभियंता खात्याद्वारे करण्यात आले आहे.

Web Title: Leakage of water channel in Bhandup, no water supply in some parts of Bhandup area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.