पोलीस स्टेशनला गळती
By admin | Published: July 18, 2014 12:28 AM2014-07-18T00:28:49+5:302014-07-18T00:28:49+5:30
खारघरमध्ये बांधलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीला उद्घाटनापूर्वीच गळती लागली आहे
वैभव गायकर, नवी मुंबई
खारघरमध्ये बांधलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीला उद्घाटनापूर्वीच गळती लागली आहे. यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर उमटू लागला असून बांधकामाच्या दर्जाविषयी शंका उपस्थित केली जात आहे.
शासनाने २०१० साली खारघरमध्ये स्वतंत्र पोलीस ठाणे उभारणीला मंजुरी दिली.त्यासाठी गृह विभागाने सिडकोकडून सेक्टर ७ प्लॉट नं.२३ ए या ठिकाणी दोन हजार चौ.मी. भूखंड मिळवून बांधकामाची जबाबदारीही सिडकोकडे सोपविली. २४ सप्टेंबर २०१२ रोजी पोलीस आयुक्त ए. के. शर्मा यांच्या हस्ते याठिकाणी भूमिपूजन करण्यात आले होते. या इमारतीमध्ये तळमजल्यावर १४ आणि पहिल्या मजल्यावर १४ अशा २८ खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. अद्याप इमारतीचे उद्घाटन झाले नसून कामकाजही सुरू झालेले नाही. पहिल्याच पावसात पहिल्या मजल्यावर मोठ्याप्रमाणात पाणी गळती झालेली दिसून येत असून ही गळती तळमजल्यापर्यंत आली आहे त्यामुळे नवीन इमारतीच्या सर्वच भिंती पाण्याने भिजल्या आहेत . याठिकाणी उभारण्यात आलेल्या सज्जामार्फत ही गळती आतमध्ये आली असल्याचे दिसून येते. इमारत बांधण्यासाठी २ कोटी १८ लाख रूपये खर्च झाले आहेत. पाणी गळतीमुळे बसविण्यात आलेल्या या सर्व सामानाला नुकसान देखील पोहचू शकते .
खारघरच्या विकास प्रक्रि येत भर पडल्यावर शिवमंदिरशेजारी पोलीस चौकी सुरु करण्यात आली. चोरी, घरफोडी आणि मंगळसूत्र चोरीच्या वाढत्या घटना पाहून सेक्टर १२ मध्ये एक रो होऊस भाड्याने घेऊन खारघरकरिता स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्यात आले.
खारघरच्या लोकसंख्येत भर पडू लागली शाळा, महाविद्यालयांचे प्रमाण वाढले. दरम्यान, सिडकोचे गोल्फ कोर्स आणि सेन्ट्रल पार्क आदी प्रकल्प सुरु झाले.त्यामुळे २४ सप्टेंबर २०१२ रोजी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी १८ महिन्यात पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे याठिकाणी इमारतीला १८ महिन्यापेक्षा जास्तीचा कालावधी लागलेला आहे , त्यामुळे कधी एकदाचे नवीन पोलीस ठाणे सुरु होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.