Join us  

गळके छप्पर, भिंतीला भगदाड; सांगा, अशा मोडक्या घरात राहायचे कसे?

By रतींद्र नाईक | Published: May 19, 2023 2:48 PM

रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असलेल्या इमारती बांधून तयार असतानाही या रहिवाशांना या कोंडवाड्यात राहावे लागत असल्याने पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल येथील रहिवासी विचारत आहेत.

मुंबई : गळके छप्पर, भिंतीला भगदाड, तुटलेल्या पायऱ्या, गंजलेले स्लॅब ही स्थिती आहे मुंबई सेंट्रल येथील संक्रमण शिबिराच्या इमारतीची. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात घरे गेलेल्या रहिवाशांना जीर्ण झालेल्या या संक्रमण शिबिरात दिवस ढकलावे लागत आहेत. रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असलेल्या इमारती बांधून तयार असतानाही या रहिवाशांना या कोंडवाड्यात राहावे लागत असल्याने पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल येथील रहिवासी विचारत आहेत.तुळशीवाडी येथील झोपड्या तोडून विकासकाने ती जागा ताब्यात घेतली आहे. झोपडीत राहणाऱ्या येथील रहिवाशांना तुळशीवाडी पोस्ट ऑफिस जवळच असलेल्या एका संक्रमण शिबिराच्या इमारतीत घरे देण्यात आली आहेत. या इमारतीत ३९ घरे असून, इमारतीची पुरती दुर्दशा झाली आहे. १० कुटुंबे अशा जर्जर इमारतीत वर्षानुवर्षे वास्तव्य करत असून, इतर रहिवासी धोकादायक इमारतीतून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले आहेत. पुनर्वसनची इमारत काही वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झाली तरी प्रकल्पग्रस्तांना घरे दिली जात नसल्याने रहिवासी मेटाकुटीला आले आहे. पावसाळ्यात इमारत केव्हाही कोसळू शकेल, अशी बेताची स्थिती असून लवकरात लवकर आमचे पुनर्वसन करण्यात, यावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. या संक्रमण शिबिराची परिमंडळ १च्या उपायुक्त संगीता हसनाळे व इतर अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाहणी केली. तसेच, विकासकाबद्दल विचारणा केली. मात्र, विकासक उपस्थित नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.

तुळशीवाडी संक्रमण शिबिरातील रहिवाशांचा जीव धोक्यात

एफआयआर दाखल करा    अलीकडेच पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर यांनी ‘सरकार आपल्या दारी’ या कार्यक्रमांतर्गत या रहिवाशांच्या तक्रारी जाणून घेतल्या व पालिका अधिकाऱ्यांना लक्ष घालण्यास सांगितले.     त्यानुसार पालिका  परिमंडळ १च्या उपायुक्त संगीता हसनाळे व इतर अधिकाऱ्यांनी रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. -    इतकेच नव्हे तर संक्रमण शिबिराची दयनीय अवस्था पाहून अधिकाऱ्यांना धारेवर धरत विकासक व संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याचे त्यांनी आदेश दिले.

पाच जण राहातो या कोंडवाड्यातपालिकेने २०१९ला पाइपलाइन तुटली होती. म्हणून रूम तोडली. गेली चार वर्षे आम्ही या कोंडवाड्यात राहत आहोत. आमच्या घरी आम्ही पाच जण राहतो, मला विजेचा शॉकही लागला अशा भयावह अवस्थेत सांगा दिवस कसे काढायचे?    -फरजाना सुभेदार, रहिवासी

इमारतींची प्रचंड दुरवस्था असून पावसाळ्यात इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण असा सवाल संक्रमण शिबीराच्या इमारतीतील लोक करत आहेत. गळके छप्पर, भिंतीला भलोमोठे भगदाड आणि जिकडे तिकडे तडे अशी परिस्थिती आहे. पाऊस सुरू झाला की येथील रहिवशांच्या मनात धडकीच भरते. गळक्या छप्परांतून पावसाचे पाणी टपकत असते. अनेक ठिकाणी तडे गेल्यामुळे पावसाचे पाणी घरात येते. बाहेरून पाहील्यास संक्रमण शिबीराची इमारत आहे की एखाद्या जुन्यापुरान्या इमारतीचे भग्नावशेष आहेत असेच जाणवते. इमारतीच्या मागे कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.या संक्रमण शिबिराची उपायुक्त संगीता हसनाळे व इतर अधिकाऱ्यांनी  पाहणी केली. विकासकाबद्दल देखील विचारणा केली. मात्र, विकासक उपस्थित नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.

येथील इमारतीत ७ दिवस पाणी नाही, पाणी विकत घेण्याची वेळ आमच्यावर आली असून, विकासकाला याबाबत विचारले असता बिल्डर म्हणतो आमचे कॉन्ट्रॅक्ट संपलेय, तुमचे तुम्ही बघून घ्या    -मुमताज खान, रहिवासी

या इमारतीत आम्हाला राहून ८ वर्ष झाली, दोनदा सोडत निघाली; पण रूम काही मिळाली नाही. पावसात आमचे काही खरे नाही अशी स्थिती आहे    -मणीबेन एलिया, रहिवासी 

टॅग्स :मुंबई