रिया पिल्लईला देखभाल खर्च देण्यास लिअँडर पेसचा नकार, न्यायालयाच्या निकालाविरोधात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 10:29 AM2022-11-14T10:29:48+5:302022-11-14T10:30:33+5:30
Leander Paes: प्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेस याने मॉडेल व माजी लिव्ह इन पार्टनर रिया पिल्लई हिला महिन्याकाठी एक लाख रुपये देखभाल खर्च देण्यास नकार दिला आहे.
मुंबई : प्रसिद्ध टेनिसपटू लिअँडर पेस याने मॉडेल व माजी लिव्ह इन पार्टनर रिया पिल्लई हिला महिन्याकाठी एक लाख रुपये देखभाल खर्च देण्यास नकार दिला आहे. दंडाधिकारी न्यायालयाने लिअँडर पेसला फेब्रुवारीत देखभाल शुल्क देण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला लिअँडर पेस याने मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मॉडेल रिया व पेस यांच्यात प्रेमसंबंध असल्याने ते २००५ साली लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यांना २००६ साली मुलगी झाली. दोघांनी काडीमोड घेतल्यानंतर २००८ साली रियाने अभिनेता संजय दत्त याच्याशी विवाह केला. नंतर त्यांचाही घटस्फोट झाला. घटस्फोट झाल्यानंतर रियाला २० कोटी रुपयांहून अधिक जास्त किमतीच्या दोन सदनिका मिळाल्या होत्या. दरम्यान, २०१४ साली रिया हिने कौटुंबिक हिंसाचार महिलांचे संरक्षण कायद्यांतर्गत दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली व २००८ साली लिव्ह-इन-रिलेशनमध्ये राहत असताना पेसने तिची भावनिक आणि आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला. दंडाधिकारी न्यायालयाने याची दखल घेत पेसला १ लाख रुपये व याव्यतिरिक्त रियाने वांद्रे (पश्चिम) येथील कार्टर रोडची सदनिका दोन महिन्यांत सोडावी या अटीवर ५० हजार रुपये देण्याचे आदेश पेसला दिले होते.
पेसचे म्हणणे काय?
आपले स्वतःचे अपार्टमेंट गहाण असून रियाने मुलीच्या नावावर केलेल्या आर्थिक मागण्या पुरविण्यास आपण असमर्थ आहोत. तसेच, न्यायालयाचे आदेश असूनही, रियाने त्यांच्या मुलीला ताब्यात घेऊन आपल्या सोबत आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी किंवा पद्मभूषणसारख्या सन्मान सोहळ्यात जाऊ नये यासाठी फितवले. रिया आपल्याच घरात राहत असून आपल्यावर आर्थिक बोजा पडला आहे. विभक्त झाल्यानंतरही मुलीची आर्थिक जबाबदारी आपण उचलली असून रियाने फक्त स्वतःसाठी पैसे खर्च केले आहेत.