पक्षनिष्ठा फडणवीसांकडून शिका, एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना शिवसेनेची चपराक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 02:41 PM2022-07-01T14:41:23+5:302022-07-01T14:42:52+5:30
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना बंडखोर आमदार आणि मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षनिष्ठेचं उदाहरण दिलं.
मुंबई - राज्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपानं शिंदे गटाच्या ५० आमदारांना पाठिंबा देत राज्यात बंडखोरांचे सरकार स्थापन केले. गुरुवारी राजभवनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी पार पडला. परंतु आता शिंदे सरकारसमोर नवा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निलंबनाची कारवाई असताना एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला कसा? असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला आहे. तर, तथाकथित मुख्यमंत्री शिवसेनेचा नाही, अशा शब्दात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधताना बंडखोर आमदार आणि मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षनिष्ठेचं उदाहरण दिलं. सावंत म्हणाले की, मुख्यमंत्रिपद शिवसेनेला द्यावं हीच मागणी उद्धव ठाकरे करत होते. पण, भाजपाने अडीच वर्षापूर्वी ते केले नाही. मात्र, आता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवलं. देवेंद्र फडणवीस यांनी मी कुठलंही पद स्विकारणार नाही हे सांगितलं. मात्र, 15 मिनिटांतच भाजप अध्यक्षांचा त्यांना फोन येतो, पंतप्रधानांचा फोन येतो आणि मग ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात. पक्षशिस्त कशाला म्हणतात, हे फडणवीसांकडून शिकावं. केवळ पक्षाच्या आदेशावरुन मुख्यमंत्री राहिलेला माणूस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो. पण, जे गेलेले आहेत त्यांनी काय केलं, सगळा महाराष्ट्र हे पाहतोय, अशा शब्दात बंडखोर आमदारांवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी निशाणा साधला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दगा देऊन आपण गेलात. पक्षप्रमुखांच्या कुठल्याही आदेशाला तुम्ही जुमानलं नाही. तर, दुसरीकडे पक्षश्रेष्ठींचा आदेश घेऊन ते उपमुख्यमंत्री होतात, हे महाराष्ट्र पाहतोय, असेही सावंत यांनी म्हटले.
राज्यपाल घटनाबाह्य वागतात
राज्यपाल घटनाबाह्य वागतात. शपथविधीला सर्वात मोठ्या पक्षाला बोलवलं जातं. मग एकनाथ शिंदेंना काय म्हणून बोलावलं. निलंबनाची नोटीस असताना शपथविधी कसा झाला? अपात्रतेची कारवाई होण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका आहे. ११ जुलैला सुनावणी होणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
...त्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन होतेय
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याचा आनंद सगळ्या शिवसैनिकांना आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आजूबाजूचे लोक चुकीचं मार्गदर्शन करतात. शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालाय ते स्वीकारलं पाहिजे. परंतु कुठेतरी अडवायचं त्यासाठी केले जातेय. परंतु यामुळे उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलीन होतेय. उद्धव ठाकरेंच्या स्वभावाबाबत नाराजी नाही. परंतु दुसऱ्याबाजूला मृतदेह येतील, घाण, डुकरं बोलले गेले. एकीकडे गटनेतेपदावरून काढायचं, आमच्याविरोधात आक्षेपार्ह बोलायचं हे कोण ऐकून घेईल असा सवाल शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी विचारला आहे.