Join us

भाजपाकडून कामाचं मार्गदर्शन शिकून घ्या; त्यांच्याकडे अनेक चांगले गुण, शरद पवारांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 10:40 AM

शरद पवार म्हणाले की, दिवसाला २४ तास काम करण्याचीही तयारी, योजनांची आखणी आणि निवडणुकांसाठी आखण्यात आलेली रणनिती यांसारखे अनेक गुण आहेत

मुंबई- राज्यात भाजपाचं सरकार येऊ देणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांनी काल (गुरुवारी) शरद पवारांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. 

भाजपा जरी आपला राजकीय प्रतिस्पर्धी असला, तरी भाजपमधील काही नेत्यांकडून शिकण्यासारखं बरच काही आहे, असं शरद पवार युवा आमदारांशी बोलताना म्हणाले. तुम्ही भाजपा नेत्यांकडून कामाचं मार्गदर्शन शिकून घ्या. कामाचं मार्केटिंग कसं करायचं हे देखील त्यांच्याकडून शिकलं पाहिजे, असं शरद पवारांनी सांगितलं. 

शरद पवार म्हणाले की, दिवसाला २४ तास काम करण्याचीही तयारी, योजनांची आखणी आणि निवडणुकांसाठी आखण्यात आलेली रणनिती यांसारखे अनेक गुण आहेत. जे भाजपा नेत्यांकडून शिकण्याची गरज आहे. नियोजनबद्ध व्यूहरचना आखून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांच्याकडून शिका, असा सल्ला शरद पवार यांनी यावेळी दिला. 

दरम्यान, राज्यात भाजपचं सरकार येऊ देणार नाही, असं ही शरद पवार यांनी सांगितलं. भाजपला कितीही प्रयत्न करू द्यात, पण मी राज्यात त्यांना पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही. सध्याच्या घडामोडींनी सरकारच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार