- सीमा महांगडेमुंबई : राज्य शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत अध्ययन-अध्यापन पद्धतीत शिक्षकांकडून नावीन्यपूर्ण प्रयोग राबविले जातात. त्याची माहिती करून घेण्यासाठी, तसेच याद्वारे एकूणच शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढीस लागावी, यासाठी दरवर्षी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या संकल्पनेतून शिक्षणाची वारी हा उपक्रम आयोजित केला जातो. यंदा २८ नोव्हेंबर ते १७ फेब्रुवारी दरम्यान ही वारी होईल. यंदाच्या वारीचे विशेष म्हणजे, प्रथमच ही वारी मुंबई, कोल्हापूर, वर्धा, नांदेड, जळगाव अशा ५ विभागीय स्तरावर आयोजित करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने यापूर्वी पुणे, अमरावती, लातूर, नाशिक, रत्नागिरी येथे या वारीचे आयोजन केले होते, पण यंदा प्रथमच वारीचे आयोजन विभागवार करण्यात आले आहे. वारीत गणित व भाषा वाचन विकास, तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर, पाठ्यपुस्तकांची बदलती भूमिका, मूल्यवर्धन, कला व कार्यानुभव, क्रीडा, स्वच्छता व आरोग्य, किशोरवयीन आरोग्य शिक्षण असे शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रम राबविले जातील. वारीत ७,२०० शिक्षक / मुख्याध्यापक पालकांचा सहभाग असेल.वारीत सहभागी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्य असणाऱ्या १०० पालक प्रतिनिधी व १०० मुख्याध्यापक/ शिक्षक पाठविण्याचे निर्देश प्रादेशिक विद्या प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत.गुणवत्ता वाढीस लागवी, शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी करण्यात आलेले हे प्रयत्न आहेत. त्यामुळे या वारीतील प्रवेश विनामूल्य देण्यात आला आहे. शिक्षणाच्या वारीस भेट देणाºया व्यक्तीची निवड करताना, ज्या शाळांची पटसंख्या २०० पेक्षा अधिक आहे, अशाच शाळेतील सदस्यांची प्राधान्याने निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.विशेष म्हणजे आयोजित करण्यात आलेली ही शिक्षणाची वारी सर्वांसाठी विनामूल्य असून, पालकांसह विद्यार्थीही वारीस भेट देऊ शकतील.मुंबईत ५0 स्टॉल्समुंबई विभागाची वारी २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे होईल. २८ नोव्हेंबरला मुंबई शहर व उपनगर, २९ नोव्हेंबरला ठाणे, तर ३० नोव्हेंबरला पालघर, रायगड येथील शिक्षकांसाठी या वारीचे नियोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय वारीत राज्यभरातील शिक्षकांचे शैक्षणिक नावीन्यपूर्ण प्रयोगावर आधारित ५० स्टॉल्स पाहायला मिळतील.
‘शिक्षणाची वारी’ यंदा पाच विभागीय स्तरावर; राज्यभरातील ७,२०० पालक, शिक्षकांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 1:51 AM