Join us

शिकणारी शाळा : ‘अभि’रंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:07 AM

शाळेतली बालवर्गापासून दहावीपर्यंतची १२ वर्षे ही संपूर्ण जीवनाची पायाभरणी करणारी वर्षे असल्याने ती आयुष्याची बेगमी ठरण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी ...

शाळेतली बालवर्गापासून दहावीपर्यंतची १२ वर्षे ही संपूर्ण जीवनाची पायाभरणी करणारी वर्षे असल्याने ती आयुष्याची बेगमी ठरण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी शिकवणारी शाळा हवी, नव्हे तर ती तशी असायला हवी. मग त्यात वर्गात धडे शिकवले जायला हवेत, ती स्थानिक भाषेच्या माध्यमातून दहावीपर्यंत शिकवणारी शाळा असायला हवी, त्याचबरोबर त्यांचे इंग्रजीही बोलणे, लिहिणे याबाबतीत पूर्ण तयारी करून घेणारी असायला हवी, त्यामुळे पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जाण्याचा ओघ खुंटेल. खेळांचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळायला हवे.

समाजात ज्या ज्या स्पर्धात्मक परीक्षा होतात त्यांची तयारी करवून घ्यायला हवी. सातव्या आठव्या इयत्तेत मुले-मुली वयात येतात, तेव्हा त्याबद्दलचे शिक्षण, समुपदेशन, जशी हुशार मुलांची वेगळी तयारी करून घेतात, तशी ढ मुलांची वेगळी तयारी करून घेण्याची सोय असायला हवी. जर दिव्यांग मुले असतील, तर त्यांच्यासाठी वेगळी सोय हवी. सांघिक गीतगायन, समारंभाच्या वेळी ओळख करून द्यायला, आभार मानायला, ध्वनिवर्धक लावायला नववी-दहावीतल्या मुलांची मदत घेतली पाहिजे. अशा अनेक गोष्टी जर शाळा करतील तर त्या खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना जीवनाचे शिक्षण देणाऱ्या ठरतील.

शाळेची देखभाल, स्वच्छता, रंगरंगोटी, तूटफुटीची दुरुस्ती करत राहावी लागते. शिक्षण खात्याच्या सूचनांची अंमलबजावणी वेळच्या वेळी करावी लागते, अंदाजपत्रक बनवणे, खर्चावर देखरेख ठेवणे, शाळा आधुनिक ठेवत राहणे अशा एक ना अनेक गोष्टी करत राहाव्या लागतात आणि त्या सर्व गोष्टीत ‘अभि’ पुरी पडलेली दिसते. काही ठिकाणी असलेले त्यांचे अपयशही त्यांनी न लपवता या पुस्तकांतून वाचकांपुढे व्यवस्थितपणे मांडले आहे. कारण कुठल्याही संस्थेत कायम यश मिळत नसते. किंबहुना चुका झाल्या तरच शिकण्याची संधी असते आणि यासाठी शिक्षण संस्था चालवणाऱ्या मंडळाला निस्वार्थी भावनेने काम करणारी माणसे सतत मिळवत राहावी लागतात, त्यातही ही शाळा यशस्वी ठरलेली दिसते.

पुस्तकाचे नाव - शिकणारी शाळा ‘अभि’रंग

प्रकाशन - ग्रंथाली प्रकाशन

पृष्ठे ३०४,

मूल्य रु. ३५०/-

-------------------------------