विद्यार्थ्यांची खंत; इंटरनेटच्या जाळ्याबाहेर राहिल्याने गरीब, ग्रामीण भागातील मुले शिक्षणापासून वंचित
सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळेची पहिली घंटा... ती ऐकताच आपापल्या वर्गात धाव घेणारे विद्यार्थी, राष्ट्रगीत, प्रार्थनेचे सूर... अशी शाळेची सुरुवात दरवर्षी ठरलेलीच असते. मात्र, काेराेनामुळे गेले वर्षभर मुलांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागत आहे. शिक्षण ऑनलाईन झाले, पण ऑफलाईन शिकण्यातील मजा हरवली, अशी खंत विद्यार्थ्यांमध्ये आहे. शिवाय राज्यातील अनेक गरीब विद्यार्थी या इंटरनेटच्या जाळ्याबाहेर असल्याने शिक्षणापासून वंचित आहेत.
सुरुवातीला दोन-चार महिने ऑनलाईन अभ्यास जोमात होता, त्यानंतर याकडे बऱ्याच अंशी दुर्लक्ष झाले. ऑनलाईन पद्धतीत विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये संवादच होत नसल्यामुळे अध्ययन-अध्यापनात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. या व्यवस्थेत शिक्षकांनी केलेले अध्यापन विद्यार्थ्यांना समजते की नाही, याचा उलगडा होत नसून, अध्ययन आणि अध्यापन रटाळवाणे, कंटाळवाणे होत असल्याचे मत विद्यार्थी, पालकांनी मांडले. अल्पावधीसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून ऑनलाईन शिक्षण परवडणारे आहे. मात्र, दीर्घकाळासाठी ते परवडणारे नाही, असे मत शिक्षक, पालकांनी व्यक्त केले.
* काही सकारात्मक बाजू :
- काेराेनाचा धोका न पत्करता विद्यार्थी शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधू लागले.
- मुलाच्या ऑनलाईन अभ्यासवर पालकांना लक्ष ठेवणे सोपे झाले.
- मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहण्याऐवजी मुले ऑनलाईन अभ्यासात व्यस्त झाली.
- पूर्वी सहा तास शाळा, त्याला जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन तास तयारी, घरी आल्यावर पुन्हा क्लासेस यासाठी जाणारा वेळ कमी झाला. अनेक मुले घरासमोरील मोकळ्या जागा, सोसायट्यांच्या रिकाम्या जागेत अधिक काळ खेळू लागली.
- तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गाेडी वाटू लागली. यू ट्यूबसह इतर तंत्रांचा अचूक वापर करता येऊ लागला.
* नकारात्मक बाजू :
- मोबाईल, टॅब किंवा संगणकासमोर अधिक काळ बसल्यामुळे डोळे, कानाचे आजार उद्भवू शकतात.
- विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केल्यामुळे यातून काही गैरप्रकारही घडू लागले. विद्यार्थ्यांची सायबर सिक्युरिटी धोक्यात आली.
- विद्यार्थी व शिक्षकांमध्ये संवाद नसल्यामुळे सर्वांगिण विकासात अडथळा निर्माण झाला. अभ्यासातील रटाळपणा वाढला.
- ग्रामीण तसेच शहरातील अनेक भागांत इंटरनेटच्या समस्येमुळे व्हिडीओ डाऊनलोड, ऑनलाईन लिंक ओपन न हाेणे अशा समस्या आल्या. अनेक गरीब पालकांकडे अँड्रॉईड मोबाइल, टॅब, संगणक यापैकी कोणतेही साधन नसल्यामुळे मुलांच्या मनात न्यूनगंड तयार हाेऊ लागला.
- वर्गमित्रांशी भेट होत नसल्यामुळे विद्यार्थी एकलकोंडे होण्याची भीती वाढली. घरात सतत पालक लक्ष देत असल्यामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले.
................