दिघ्याच्या ११ इमारतींना अखेर अभय - हायकोर्ट
By admin | Published: October 17, 2015 02:35 AM2015-10-17T02:35:13+5:302015-10-17T02:35:13+5:30
नवी मुंबईच्या बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवण्याचे सत्र सुरू असताना ११ इमारतींना मात्र उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे
मुंबई :नवी मुंबईच्या बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवण्याचे सत्र सुरू असताना ११ इमारतींना मात्र उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एमआयडीसीने बजावलेल्या नोटिशीविरुद्ध दिवाणी न्यायालयात संबंधित इमारतींचे रहिवासी धाव घेणार आहेत.
नवी मुंबईचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्याचे आदेश न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसीला दिले होते. एमआयडीसीने मात्र कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच बांधकाम पाडण्यास सुरुवात केली, असा आरोप ११ इमारतींच्या रहिवाशांनी केला आहे. खंडपीठाने त्यांचे म्हणणे ग्राह्य धरत ही बांधकामे पाडण्यास स्थगिती दिली; तर सिडकोच्या जागेवर असलेल्या दुर्गा प्लाझा इमारतीच्या रहिवाशांनीही ३० नोव्हेंबरपर्यंत इमारत न पाडण्यासंदर्भात अर्ज केला. खंडपीठाने त्यांनाही ३० नोव्हेंबरपर्यंत फ्लॅट खाली करण्याचे आश्वासन देण्यास सांगितले. या याचिकांवरील सुनावणी १९ आॅक्टोबर रोजी होईल.
दरम्यान, दिघा येथील अनधिकृत बांधकामप्रकरणी बेघर झालेल्या दोघांनी सात जणांविरोधात रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झालेले रहिवासी अनधिकृत इमारतींच्या बिल्डरविरोधात तक्रार करण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)