लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुरामुळे ज्या व्यावसायिक, दुकानदारांचे आणि नागरिकांचे नुकसान झाले, त्यांना त्यांच्या विमा दाव्याची किमान ५० टक्के रक्कम तरी तातडीने द्यावी. विमा दावे निकाली काढण्यासाठी राज्याच्या महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे ग्राह्य धरावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या संदर्भात विमा कंपन्यांना निर्देश देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्राद्वारे केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पूरग्रस्त भागातील विमादाव्यांबाबत विमा कंपन्यांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासह अधिकारी आणि ११ विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर निर्मला सीतारामन यांना पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणाले की, पंचनाम्याच्या आधारे ५० टक्के रक्कम देण्याची तयारी विमा कंपन्यांनी दाखविली आहे. मात्र यासाठी केंद्र शासनाकडून विमा कंपन्यांच्या मुख्यालयास आणि आयआरडीएला योग्य ते निर्देश किंवा सूचना मिळणे आवश्यक आहे. यापूर्वी देखील जम्मू-काश्मीर आणि केरळमधील मोठ्या पुराच्या वेळेला अशा प्रकारे केंद्र सरकारने विमा कंपन्यांना निर्देश दिले होते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
बँकांनाही सवलतीच्या व्याजदरात कर्ज द्यावे
मुख्यमंत्र्यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या प्रतिनिधींसोबतही बैठक घेतली. सर्व बँकांनी पूरग्रस्त भागातील शाखांमधून बँकिंग व्यवसाय त्वरित सुरू करावा, नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना खेळत्या भांडवलाकरिता सवलतीच्या व्याजदरात कर्ज द्यावे, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी काही महिन्यांची सवलत द्यावी, अशा सूचना बँकांना दिल्या आहेत. केंद्रानेही तसे निर्देश द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे.
विमा कंपन्यांनी प्रक्रिया सुटसुटीत करावी
दावे निकाली काढताना कंपन्यांनी आपली नियमावली दाखवून आधीच अडचणीत असलेल्या विमाधारक व्यावसायिकांना आणखी अडचणीत आणू नये. दावे निकाली काढण्याची पद्धत सुटसुटीत आणि सोपी करावी, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या बैठकीत कंपन्यांना सांगितले.
पूरग्रस्त भागांची तातडीने स्वच्छता अत्यावश्यक आहे. त्यामुळे केवळ विमा दाव्यांसाठी वस्तू आणि वाहने आहे, त्या नुकसानग्रस्त स्थितीत ठेवणे शक्य होणार नाही. त्यामुळे महसूल यंत्रणेने पंचनामे करताना नुकसानीचे सुस्पष्ट छायाचित्रे काढावीत, महसूल यंत्रणेचे हे पंचनामे आणि छायाचित्रे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावीत, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.