मुंबई : मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. पूर्वी श्रीमंतांना होणारा आजार म्हणून मधुमेह ओळखला जात होता. पण आता तर श्रमिकही त्याला बळी पडू लागले आहेत. अजूनही खेड्यापाड्यांमध्ये राहणाऱ्या जनतेला मधुमेहाविषयी फारशी माहिती नाही. अशात हलाखीच्या परिस्थितीमुळे आजार अंगावर काढण्याशिवाय पर्याय नाही. अशांना मदत करण्यासाठी मुंबईतली गलेलठ्ठ पगाराची नोकरी, खासगी प्रॅक्टिसमधून मिळणारे बक्कळ उत्पन्न धुडकावून पस्तिशीतल्या डॉ. मानस सावे यांनी थेट तारापूरच्या आदिवासी पाड्यांची वाट धरली. डॉ. मानस बोईसरच्या तारापूर गावातले. एमबीबीएसचे शिक्षण त्यांनी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील येथून २००५ साली पूर्ण केले. यानंतर त्यांनी मुंबईच्या खासगी रुग्णालयातून प्रॅक्टिस सुरू केली. नायर रुग्णालयातून त्यांनी मधुमेह विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. २०१० साली त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. यानंतर त्यांनी मुंबईतील रुग्णालयांत नोकरी केली. रुग्णालयात नोकरी करत असताना अनेक गोष्टी डॉ. मानस यांना खटकत होत्या. यामुळेच २०१४ मध्ये त्यांनी मुंबईतील नोकरी सोडून आपल्या गावी तारापूरला जाऊन, सामान्यांमध्ये मधुमेहाविषयी जनजागृती करायची, औषधोपचार करून सेवा करायची, असा निश्चय केला. सध्या ते हीच सेवा करत आहेत. शहरांप्रमाणे गावातही मोबाइलचा वापर होतो. इंटरनेटही खेड्यापाड्यांवर पोहोचले आहे. तंत्रज्ञान पोहोचले तरी अद्याप अनेक विषयांबाबत गावांमध्ये अनभिज्ञता दिसते. पण, आरोग्य क्षेत्रातील तंत्रज्ञान गावात पोहोचलेले नाही. शहर आणि गावातील दरीमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागतो. मुंबईजवळ राहणाऱ्या गावातील लोकांना उपचार घेण्यासाठी मुंबईचीच वाट धरावी लागते. मुंबईत आल्यावरही त्यांना डॉक्टरांची वेळ मिळतेच असे नाही. डॉक्टरांचे शुल्क कमी असले तरीही त्यांना औषधांसाठी येणारा खर्च जास्त असतो. हे अनेकांना परवडत नाही. अशांसाठी काम करण्याची इच्छा होती. मी जिथे मोठा झालो, त्या गावातही लोकांची मदत करावी यासाठी मी तारापूरला गेलो, असे डॉ. मानस यांनी सांगितले. नोकरी करताना समाधान मिळत नव्हते. मधुमेहाची औषधे घेतली म्हणजे काम झाले, असे नाही. मधुमेह म्हणजे काय, त्यावरील उपचार, लक्षणे, घ्यायची काळजी याविषयी माहिती देणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरात हेच काम मी प्रामुख्याने करतो आहे. नुसते उपचार नाही, तर समुपदेशनाचे काम करत आहे. लोकांमध्ये राहून काम करायला मिळते याचा आनंद आहे. पण अजून काम करायचे आहे, असे डॉ. मानस यांनी सांगितले.
नोकरी सोडून धरली गावची वाट!
By admin | Published: July 01, 2015 12:58 AM