Join us

शांघाय सोडा; आहे त्या मुंबईचाही बट्ट्याबोळ! मानखुर्द, गोवंडीत नागरी प्रश्नांवर शून्य टक्के काम

By सचिन लुंगसे | Published: April 11, 2023 6:52 AM

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीसह उर्वरित राजकीय पक्ष, उमेदवारांनी गेल्या महापालिका निवडणुकीवेळी झोपड्यांचा विकास करणार, झोपड्यांना पुरेसे पाणी देणार

मुंबई :

भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीसह उर्वरित राजकीय पक्ष, उमेदवारांनी गेल्या महापालिका निवडणुकीवेळी झोपड्यांचा विकास करणार, झोपड्यांना पुरेसे पाणी देणार, आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सेवा-सुविधा देणार, असे म्हणत जाहीरनाम्यात आश्वासनांची बरसात केली होती. मात्र, निवडून आल्यानंतर आता पाचपेक्षा जास्त वर्षे उलटूनही बहुतांश झोपडपट्ट्यांत पाणी, पुनर्वसन आणि आरोग्याच्या किमान पायाभूत सेवा-सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. मानखुर्द, गोवंडीसह जवळच्या परिसरात तर नागरी प्रश्नांवर शून्य टक्केही काम झालेले नाही. त्यामुळे सौंदर्यीकरणाचा मुलामा वगळला तर झोपडया आजही सुविधांपासून वंचित आहेत. 

दाटीवाटीची वस्ती साकीनाका, काजुपाडा, जरीमरी, कमानी, बैलबाजार, पवई पोलिस ठाणे परिसर, संघर्ष नगर, असल्फा, मोहील व्हिलेज, कृष्णा नगर, पाइपलाइन रोड, लिंक रोड, क्रांती नगर, कुर्ला पश्चिम बस आगार परिसर, कपाडिया नगर, टिळकनगर, नेहरूनगर, कसाईवाडा, चुनाभट्टी आणि कुर्ला रेल्वे स्थानक येथे दाटीवाटीची वस्ती आहे. 

कुठे आहेत झोपड्या  मालाड मालवणी - रेतीबंदरसह शिवडी - मानखुर्द, चेंबूर, गोवंडी - वडाळा येथील कोरबा मिठागर - कुलाबा येथील बधवार पार्क - कालिना, सांताक्रुझ, कुर्ला, विलेपार्ले, मरोळ - जोगेश्वरी, कांदिवली आणि बोरीवली.

झोपड्यांचे टॉवरकुर्ला, वांद्रे, गोवंडी, मानखुर्द आणि मालाड या परिसरात अशा टॉवरची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा बांधकामांचा दर्जा अतिशय कच्चा असतो. निकृष्ट दर्जाचे साहित्य अशा बांधकामाकरिता वापरले जाते. अनेकवेळा लोखंड अथवा भक्कम अशा खांबांचा वापर करण्याऐवजी लाकडी साहित्याचा वापर करून अशी बांधकामे उभी करण्याकरिता केला जातो. 

अनेक झोपडपट्ट्यांमध्ये समस्यांचा अभावमुंबईच्या उपनगरात वन विभागाच्या जमिनीवर ज्या झोपड्या आहेत; तिथे अद्याप पाणी पुरवठा झालेला नाही. आंबेडकरनगर, पिंपरीपाडा, अप्पापाड्यातील रहिवाशांनी पुनर्वसनासाठी सरकारला पैसे दिले आहेत. मात्र, आजही समस्या सुटलेल्या नाहीत. त्यांना अजून पाणी मिळालेले नाही; कारण का तर त्या झोपड्या वन विभागाच्या जागेवर आहेत. कफ परेड येथील झोपड्यांना पाणी नाही. उपनगरात एम-इस्ट वॉर्ड हा सगळ्यात गरीब वॉर्ड आहे. येथील लोकसंख्या ९ लाख आहे. ९० टक्के लोक झोपड्यांत राहतात. येथेही पाणी नाही. 

 मुंबईच्या उपनगरातील प्रदूषणाने तर कहर केला आहे. माहुलचे प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांचे आयुष्य कमी होत आहे. टाटा इन्स्टिट्यूटचे येथे एक सर्वेक्षण झाले होते. त्यानुसार येथील नागरिकांचे आयुष्य ३७ वर्षे आहे.  येथे पुनर्वसनासाठी बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये हवा पुरेशी खेळती नाही. रहिवाशांना क्षयरोगाला सामोरे जावे लागत आहे. या वस्त्यांमध्ये मानखुर्द, शिवाजीनगर, गोवंडी आहे. पश्चिम उपनगरात पी-नॉर्थ वॉर्डमध्ये अनेक समस्या आहेत. पाण्याचा पुरेसा पुरवठा आता होत आहे. मात्र, रस्ते नाहीत. पाऊस आला की रस्ते चिखलाने माखतात. 

राजकीय वचननामा या सोयी आहेत. सत्तेत आल्यानंतर  त्याची अंमलबजावणी केली जात नाही, हे दुखणे आहे. मतदारही याबाबत साशंक आहेत. मुंबईतल्या झोपड्यांचे सर्वेक्षण किंवा आकडा महापालिका, एसआरएसारख्या प्राधिकरणांकडे नीट उपलब्ध नाही. विधानसभानुसार जरी विचार केला तरी प्रत्येक वर्षी झोपड्यांची संख्या १० ते १५ टक्क्यांनी वाढत आहे. झोपड्यांची संख्या प्रशासनाच्या आशीर्वादाने वाढते की राजकीय? हे कोडेच आहे. - सुरेंद्र मोरे, गृहनिर्माण अभ्यासक

महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवाराने आपल्या जाहीरनाम्यात झोपड्यांमध्ये पाणी देऊ, आरोग्य सुविधा बळकट करू, पुरेशा नागरी सेवा-सुविधा देऊ, असे आश्वासन दिले होते. आज पाच वर्षे पूर्ण होऊनही झोपडपट्ट्यांत परिस्थिती आहे तशीच आहे. एम इस्ट वॉर्ड तर आहे तसा आहे. येथे शून्य टक्केही कामे झालेली नाहीत. सौंदर्यीकरण केले म्हणजे नागरी समस्या सुटत नाहीत. सार्वजनिक आरोग्यासाठी किमान पायाभूत सेवा-सुविधा असणे अपेक्षित असते. मात्र, तेच झालेले नाही. - बिलाल खान, मुंबईतील प्रश्नांचे अभ्यासक

टॅग्स :भिवंडी