Join us  

उद्या गरज असेल तरच घराबाहेर पडा; तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 7:47 AM

रविवारी ३० ऑक्टोबरला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मुंबई : रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ३० ऑक्टोबरला रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वे   कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर  कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५  वाजतापर्यंत  परिणाम : या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंडदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबतील. ठाण्याच्या पलीकडे या जलद गाड्या पुन्हा  डाउन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर स्थानकांवर थांबवल्या जातील. त्यापुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर वळविल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

हार्बर रेल्वेकुठे : कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर  कधी : स. ११. १० ते सायं.४. १० वाजतापर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूर/वाशीकरिता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी या भागांत विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

पश्चिम रेल्वे   कुठे : गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान अप धीम्या आणि डाउन जलद मार्गावर कधी : रात्री १२. २५ ते पहाटे ४.२५ वाजतापर्यंत परिणाम : या ब्लॉकदरम्यान डाउन दिशेच्या सर्व जलद गाड्या गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान डाउन धीम्या मार्गावर धावतील. तर, अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल सेवा गोरेगाव ते सांताक्रूझदरम्यान अप जलद मार्गावर धावतील. सर्व धीम्या गाड्यांना विलेपार्ले स्थानकावर दुहेरी थांबा दिला जाणार आहे. 

टॅग्स :मुंबई लोकल