Join us

वाहन सोडतो, त्यासाठी २६ हजार रुपये दे... रेल्वेच्या अभियंत्यांनी कंत्राटदाराकडे मागितली लाच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 8:23 AM

Indian Railway: खासगी कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाड्यांचे पैसे कंत्राटदाराला देण्यासाठी लाच मागणाऱ्या शिवय्या आणि राजीव या रेल्वेच्या दोघा वरिष्ठ विभागीय अभियंत्यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई - दक्षिण-मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, पूर्णा, नांदेड या रेल्वे डेपोमधील कर्मचाऱ्यांसाठी खासगी कंत्राटदाराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाड्यांचे पैसे कंत्राटदाराला देण्यासाठी लाच मागणाऱ्या शिवय्या आणि राजीव या रेल्वेच्या दोघा वरिष्ठ विभागीय अभियंत्यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.  संबंधित कंत्राटदाराची तीन वाहने रेल्वेने भाडेतत्त्वावर घेतली होती. याकरिता संबंधित कंत्राटदाराला प्रति महिना प्रति वाहन ४७ हजार ९९९ रुपये देण्याचे ठरले. दोन वर्षांकरिता हे कंत्राट होते. त्याला एकूण ३५ लाख ५५ हजार ९२८ रुपये मिळणे अपेक्षित होते. या व्यक्तीचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर त्याने सातत्याने या रेल्वे इंजिनीअरकडे देय व्यवहार पूर्ण करण्यास फेऱ्या मारल्या. मात्र, यापैकी शिवय्या याने जर १० हजार रुपये दिले तर त्याचे बिल पास करण्यात येईल, असे सांगत त्याच्याकडून आगाऊ रक्कम म्हणून पाच हजार रुपये घेतल्याचा आरोप या प्रकरणी  कंत्राटदाराने केला आहे. तर, दुसऱ्या प्रकरणात राजीव नावाच्या अधिकाऱ्याने संबंधित कंत्राट संपल्यावरदेखील त्याची गाडी सोडली नाही. तसेच त्याच्याकडून १६ हजार रुपयांची लाच मागितली. या कंत्राटदाराने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या दोनही अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. अधिकाऱ्यांनी  सापळा रचून  लाचखोरीचे बोलणे रेकॉर्ड केले व त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. 

खिशातील रक्कमही घेतलीधक्कादायक गोष्ट म्हणजे, राजीव याच्याकडे जेव्हा हा कंत्राटदार गेला तेव्हा त्याच्यावर दबाव टाकून त्याच्या खिशात असलेले दोन हजार रुपये त्याने काढून घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :भारतीय रेल्वेलाच प्रकरण