जायकवाडीमध्ये तत्काळ पाणी सोडा; हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना
By यदू जोशी | Published: October 23, 2018 04:43 AM2018-10-23T04:43:34+5:302018-10-23T12:38:33+5:30
मराठवाड्यातील जायकवाडी धरणात वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची कार्यवाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ सुरु करा, असे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला सोमवारी सुनावले.
मुंबई : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात वरच्या धरणांमधून पाणी सोडण्याची कार्यवाही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ सुरु करा, असे महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला सोमवारी सुनावले. हायकोर्टाने दिलेला आदेश आणि आज प्राधिकरणाने त्यावर दिलेले निर्देश या पार्श्वभूमीवर जायकवाडीमध्ये कधीपासून पाणी सोडणार, असे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांना विचारले असता ते म्हणाले, उद्या मी वरिष्ठांशी (जलसंपदा मंत्री व सचिव) चर्चा करेन आणि त्यांच्या सूचनांनुसार निर्णय घेण्यात येईल.
१५ आॅक्टोबरपर्यंतच्या धरणांमधील पाणीसाठ्याचा आढावा घेऊन जायकवाडी धरण ६१ टक्के भरेल इतके पाणी वरच्या धरणांमधून सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने अलिकडेच दिले होते. त्यानुसार १८ आॅक्टोबरपर्यंत जायकवाडीमध्ये पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र, आज २२ तारीख आली तरी अंमलबजावणी सुरू झालेली नाही. राजकीय दबावामुळे निर्णय होऊ शकत नसल्याची स्थिती आहे.
>शुक्रवारचे पत्र शनिवारी मेल
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही गोदावरी पाटबंधारे महामंडळाने काही प्रश्न/शंका उपस्थित करणारे एक पत्र महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाला लिहिले आणि प्राधिकरणाचे त्या बाबत मत मागितले. मजेशीर बाब ही की हे पत्र १९ आॅक्टोबरचे (शुक्रवार) आहे, पण ते प्राधिकरणाला शनिवारी ई-मेलने पाठविण्यात आले. शनिवारी प्राधिकरणाला सुट्टी होती. आज प्राधिकरणाचे कार्यालय सुरू होताच, जायकवाडीत पाणी तत्काळ सोडा, असे पत्र प्राधिकरणाकडून महामंडळास दुपारीच पाठविण्यात आले.
>जायकवाडीमध्ये तत्काळ पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपत्ती प्राधिकरणाने आजच आम्हाला दिले आहेत. या बाबत मी वरिष्ठांशी चर्चा करेन आणि नंतर निर्णय घेतला जाईल.
- अजय कोहिरकर,
कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ.