प्रत्येक तिसरा लेटमार्क ठरणार रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:06 AM2021-01-02T04:06:17+5:302021-01-02T04:06:17+5:30

प्रत्येक तिसरा लेटमार्क ठरणार रजा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कार्यालयात उशिराने पोहोचणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात चांगलाच चाप ...

Leave will be every third latemark | प्रत्येक तिसरा लेटमार्क ठरणार रजा

प्रत्येक तिसरा लेटमार्क ठरणार रजा

Next

प्रत्येक तिसरा लेटमार्क ठरणार रजा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कार्यालयात उशिराने पोहोचणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात चांगलाच चाप बसणार आहे. महिन्यातून केवळ दोन वेळाच जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असणार आहे. त्यानंतरच्या तिसऱ्या ‘लेटमार्क’साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची रजा वजा करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) गुरुवारी जारी केला आहे.

मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील शासकीय विभाग, कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सकाळी कार्यालयात पोहोचण्यासाठी एका महिन्यात दोन वेळा जास्तीत जास्त दीड तास उशिरा येण्याची सवलत असेल. त्यानंतरच्या तिसऱ्या उशिरा उपस्थितीसाठी एक नैमित्तिक रजा वजा करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत. शिवाय, एकाच महिन्यातील तीनपेक्षा अधिक वेळा उशिरा उपस्थितीसाठी म्हणजेच सहाव्या, नवव्या, आदीसाठी प्रत्येकी एक नैमित्तिक रजा वजा करावी. नैमित्तिक रजा शिल्लक नसेल तर अर्जित रजा वजा करावी. ज्यांची अर्जित रजा शिल्लक नसेल, त्यांची असाधारण रजा (विनावेतन) मंजूर करावी. रजेची सवलत महिन्यातील केवळ पहिल्या नऊ उशिरा उपस्थितीसाठी असेल. त्यापुढील उशिरासाठी असाधारण (विनावेतन) रजा मंजूर करण्यात यावी. परिवर्तित रजा ही केवळ वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात येत असल्याने कोणत्याही परिस्थितीत उशिरा उपस्थितीसाठी ही रजा मंजूर करण्यात येऊ नये, अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये जारी केलेल्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी आहे. त्यामुळे गट-अ ते गट-क च्या अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कार्यालयीन उशिरा उपस्थिती ही दीड तास म्हणजेच सकाळी ११.१५ वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात यावी. तसेच शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेळ ही सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० अशी असल्याने त्यांचे बाबतीत उशिरा उपस्थिती ही सकाळी ११.०० वाजेपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे. मात्र, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे किंवा कर्मचाऱ्यांच्या नियंत्रणाबाहेरील आकस्मिक घटनेमुळे जे कर्मचारी उशिरा येतील, त्यांची उशिरा उपस्थिती न मांडता खातरजमा करून ती माफ करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.

Web Title: Leave will be every third latemark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.