Join us

विमान सोडतला वेंगुर्ल्यात, घरात पोचासर व्हये ५ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : येत्या ९ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून नियमित प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. कोकण रेल्वेप्रमाणे हवाई ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : येत्या ९ ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून नियमित प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. कोकण रेल्वेप्रमाणे हवाई तिकिटांचे आरक्षणही फुल्ल झाल्याने या मार्गावर भविष्यात चांगला प्रतिसाद मिळण्याची आशा हवाई वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. असे असले तरी विमानातून उतरल्यानंतर पुढील प्रवासासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडणार आहे. विशेषतः वैभववाडी, कणकवली, देवगड आणि खाली बांदा, दोडामार्गला जाणाऱ्यांना गावात पोहोचेपर्यंत विमान तिकिटाइतकी रक्कम मोजावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर हवाई प्रवासारंभाबद्दल चाकरमान्यांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद.

...

कुतूहल म्हणून एकवेळा विमान प्रवास ठीक आहे. पण नियमित प्रवासासाठी कोकण रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण विमानातून उतरल्यानंतर गावात पोहोचेपर्यंत आणखी दीड ते दोन हजार रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे जाण्या-येण्यासाठी निव्वळ १० हजार रुपये बाजूला काढून ठेवावे लागतील.

- दीपक सावंत, चाकरमानी, बोरिवली

माझा गाव बांदा परिसरात आहे. २,५२० रुपये देऊन चिपी विमानतळावर उतरल्यानंतर तिथून पुढे रिक्षाने १२०० ते १५०० रुपये खर्चून एसटी स्टँड आणि पुढे गावात पोहोचायला १०० ते २०० रुपये खर्च येईल. इतक्या पैशांत माझे संपूर्ण कुटुंब दोनवेळा मुंबई-कोकण प्रवास करेल.

- मनोहर राणे, चाकरमानी, सांताक्रूझ

विमान मुंबईहून ११.३५ ला सुटणार म्हणजे चेक-इन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विमानतळावर आधी दीड तास पोहोचावे लागेल. मी राहतो मुलुंडला, तिथून अंधेरीला पोहोचायला दोन तास. सकाळी साडेसातला घर सोडले तरच वेळेत विमानतळ गाठता येईल. चिपीला १ वाजता उतरल्यानंतर गावात पोहोचेपर्यंत तीन ते चार तास लागतील. एकूण प्रवास झाला ८ तासांहून अधिक. इतके करून ५ हजार रुपये मोजावे लागतील. त्यापेक्षा दिवा-सावंतवाडी पॅसेंजर काय वाईट? २०० रुपयांत घरी.

- राजा गोसावी, चाकरमानी, मुलुंड

इतर विमानतळांप्रमाणे सिंधुदुर्गला अंतर्गत प्रवासी सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने सध्यातरी हवाई प्रवास खिशाला न परवडणारा आहे. भविष्यात त्यात सुधारणा झाल्यास गावी जाताना हवाई मार्गाचा विचार करता येईल.

- संदेश मेस्त्री, चाकरमानी, अंधेरी

.....

हौस म्हणून एक-दोनदा मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवास करता येईल, पण नियमित हवाई मार्गाने जाणे सर्वसामान्य चाकरमान्यांना परवडणारे नाही. इतक्या खर्चात बस किंवा रेल्वेने जाण्या-येण्यासह आठ दिवस गावी राहण्याचा खर्च भागेल.

- शेखर तर्फे, अध्यक्ष कोकण विकास आघाडी