ट्रेन सुटणार हे पिल्लू सोडल्याने गर्दी झाली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:56 AM2020-04-15T05:56:32+5:302020-04-15T05:56:32+5:30
ते म्हणाले की, जे परप्रांतीय मजूर व इतर मुंबईत आहेत. त्यांच्या नाश्त्याची, दोन वेळ जेवणाची, वैद्यकीय सेवेची व्यवस्था सरकारने केलेली आहे. हे लोक आमच्या इथे सुरक्षित आहेत
मुंबई : आपल्या राज्यांमध्ये जाण्यासाठी १४ तारखेनंतर ट्रेन सुरू होत आहेत, असे कळल्याने लोकांनी वांद्रे स्टेशनला गर्दी केली. कोणीतरी तसे पिल्लू सोडल्याने हा प्रकार घडला. परप्रांतातील लोकांनी त्यांच्या राज्यात जाण्याची घाई करू नये त्यांची आम्ही सर्व व्यवस्था केली आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. केंद्र व राज्य सरकार कोरोनाचा मुकाबला हातात हात घालून करीत असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील जनतेशी मंगळवारी संवाद साधताना त्यांनी वांद्रे येथे घडलेल्या घटनेचा आवर्जून उल्लेख केला.
ते म्हणाले की, जे परप्रांतीय मजूर व इतर मुंबईत आहेत. त्यांच्या नाश्त्याची, दोन वेळ जेवणाची, वैद्यकीय सेवेची व्यवस्था सरकारने केलेली आहे. हे लोक आमच्या इथे सुरक्षित आहेत. महाराष्ट्रातून इतर राज्यात गेलेल्या लोकांची तेथील सरकार काळजी घेत आहे. तसेच आम्ही इथे घेत आहोत. घाबरण्याचे कारण नाही. लॉकडाऊन म्हणजे लॉकआऊट नाही. तुम्ही आपल्या देशात आहात. जेव्हा केंद्र सरकारचा निर्णय होईल, तेव्हा आमचे सरकार आणि केंद्र सरकार या मजुरांना त्यांच्या राज्यात पोहोचण्याची व्यवस्था करेल, असे ठाकरे म्हणाले.
आजची परिस्थिती राजकारण करण्याची नाही. गोरगरीब लोकांच्या भावनांशी खेळून कायदा व सुव्यवस्था बिघडवतील ते कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाहीत हे लक्षात ठेवा, असा इशारा ठाकरे यांनी दिला. गैरसमजाची पिल्लं सोडून द्यायची, असे कोणी करू नये. आपल्या येथे आगीचे बंब खूप आहेत, पण त्यांचा बंदोबस्त केला जाईल. मी त्यांना आग फैलावू देणार नाही, असेही त्यांनी सुनावले.